सहिष्णुता, बंधुभाव जपण्यातच शहाणपणा

राज्यात अनेक महामानवांचे हजारो पुतळे उभारले आहेत. पण या पुतळ्यांची देखभाल करण्याकडे आपले लक्ष आहे का, याचा विचार व्हायला हवा. केवळ जयंती, पुण्यतिथीला आपण जागे होऊन चालणार नाही. या महामानवांच्या विचारांचे बोट पकडून आपण पावले टाकायला हवीत. धार्मिक सहिष्णुता ही गोमंतकीयांची ओळख आपणच जपायला हवी.

Story: वर्तमान |
14th March, 11:48 pm
सहिष्णुता, बंधुभाव  जपण्यातच शहाणपणा

गोव्यात शिमगोत्सव अपूर्व उत्साहात पार पडला. त्या आधी शिवजयंती दणक्यात साजरी झाली. उत्सवप्रिय गोमंतकीय या दोन्ही सणांना दरवर्षी अधिकाधिक भव्यदिव्य बनवताना दिसतात. सांस्कृतिक संचित जपण्याच्या दृष्टीने ही खूपच आश्वासक बाब आहे. या दोन्ही सणांच्या अनुषंगाने दोन गाेष्टी ठळकपणे दिसून आल्या. एक म्हणजे, शिमगोत्सवातील गोमंतकीयांचा पारंपरिक धार्मिक सलोखा आणि दुसरे म्हणजे, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवरील सकारात्मक, नकारात्मक बाबी. या दोन्ही गोष्टींवर विचारमंथन व्हायला हवे.

त्याआधी सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य स्थितीचे अवलोकन करण्याची गरज आहे. हल्ली अनेक जण मागचापुढचा विचार न करता उठसूट युद्धखोर वृत्तीला पाठिंबा देताना दिसतात. या पाठिंब्याच्या आडून विशिष्ट धर्माच्या लोकांना चिथावण्याचे उद्योग करतात. इराणवरील इस्रायल-अमेरिकेचा हल्ला याच नजरेतून अनेकांना हवाहवासा वाटला. मात्र इराणने कच्चे तेल आणि त्यानंतर वायू पुरवठ्याबाबत केलेली कोंडी पाहता, युद्धखोरीची भाषा करणारे हळूहळू विरघळू लागले. काल-परवापर्यंत इराणचे नामोनिशाण मिटायला हवे, असे म्हणणारे लोक कच्च्या तेलाची जहाजे भारताच्या दिशेने येतील, या वृत्तानेच हुरळून गेले. कारण कसलाच संबंध नसताना युद्धामुळे जी कोंडी भारतासारख्या बलाढ्य देशाची​ झाली, ती सर्वसामान्यांच्या दैनंदिन व्यवहारावर परिणाम करणारी ठरली. आपल्या घरापर्यंत युद्धाच्या झळा जाणवू लागल्याने अखेरीस विवेकबुद्धी जागी झाल्यासारखे अनेक जण युद्ध थांबायला हवे, सर्वसामान्यांना त्रास होता नये अशी नरमाईची भाषा वापरू लागले. एका विशिष्ट धर्माचा देश संकटात सापडल्यामुळे आनंदाच्या उकाळ्या फुटणारे आता त्याच देशातून येऊ पाहणाऱ्या जहाजांकडे जणू आपल्याला ‘संजीवनी’ मिळणार अशा श्रद्धाभावाने डोळे लावून बसले आहेत. एका दृष्टीने युद्धाच्या दुष्परिणामांची या प्रवृत्तीच्या लोकांना अल्प काळात झालेली ही उपरती गरजेची होती. अशांना सहिष्णुता वगैरे गोष्टी त्याज्य असतात. सर्वसमभाव हा शब्द तर शिवीसारखा वापरला जातो. गोव्यासारख्या बहुधार्मिक राज्यात ही प्रवृत्ती आडूनआडून फोफावते आहे. केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील मुद्देच नव्हे, तर लहानसहान गोष्टीतही धर्म, जात आणून दुहीची बीजे रोवण्याची वृत्ती दिसून येते. अशा लोकांनी सत्तरी आणि डिचोली तालुक्यातील दोन ठिकाणी शिमगोत्सवाच्या होणाऱ्या पारंपरिक रिवाजांचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

पर्ये-सत्तरी येथील हजरत बाबल पीर दर्ग्यासमोर शिमगोत्सवातील घोडेमोडणीचा सन्मान करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून जपली आहे. स्थानिक हिंदू आणि मुस्लिमांतील सौहार्दाचे दर्शन येथे घडते. शिमग्याच्या दरम्यानच डिचोली तालुक्यातील सुर्ल-साखळी येथे पीर बाबा दरग्याच्या भेटीला देवाच्या गुढ्यांची प्रतिके, मंदिरातील श्रीफळ घेऊन हिंदू लोक जातात. सावईवेरे या फोंडा तालुक्यातील परिसरातही हा सलोखा टिकून आहे. कुंकळ्ळीतील हिंदू-ख्रिस्तींचे बंधुत्वाचे नाते तर सुपरिचित आहे. असे सण आणि त्यातील परंपरा हे जुन्या काळातील ऋणानुबंध जोपासण्याचे माध्यम आहे. ते प्राणपणाने जपायला हवे. जुन्या पिढीने नव्या पिढीला त्याचा इतिहास, सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्व सांगायला हवे. दोन्ही बाजूंच्या विशिष्ट कट्टर, कडवट विचारसरणीच्या अपप्रचाराला बळी न पडता, एकमेकांप्रतीचा हा श्रद्धाभाव वाढवायला हवा. शिमगोत्सवाचा संदेशच मुळी ‘वाईट गोष्टींची होळी’ असा आहे. ताे आचरणात आणून सर्वांकडूनच समाजहिताचे वर्तन कसे घडेल, याकडे कटाक्ष असायला हवा. केवळ द्वेषाचे फुत्कार न काढता परस्परसंवादातून आपण बऱ्याच गोष्टी साध्य करू शकतो, हे समजून घ्यायला हवे. ही सहिष्णुता जपतानाच कोणी कायदाबाह्य गैरवर्तन करत असेल, समाजमनात विष कालवण्याचा प्रयत्न करत असेल, तर कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनाही ताळ्यावर आणायला हवे. अशा दोन-चार घातकी लोकांमुळे सगळ्या समाजाला त्याच पारड्यात तोलण्याचा आततायीपणा करणे चुकीचे आहे. काल-परवा वाळपईत पाकिस्तानी पोषाख उपलब्ध असल्याची​ जाहिरात झळकली. त्या आधी काही महिन्यांपूर्वी कळंगुटमध्ये आस्थापनांवर पाकिस्तानची भलामण करणारे डिजिटल फलक दिसून आले. त्याच दरम्यान मडगावातील एका मदरशात शिकणाऱ्या मुलाने पाकिस्तानबाबत कौतुकाचे उद्गार काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अशा प्रकारांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. त्यासाठी सर्व धर्मियांनी एकोप्याने समोर यायला हवे. अशा प्रसंगी संबंधित घटकांनी शांत राहणे ही एकप्रकारे मूक संमतीच समजली जाऊ शकते. ही समाजहितैशी जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायला हवी. 

आता थोडे शिवजयंतीबद्दल. हल्ली शिवजयंती आणि वाद यांचे जणू सख्य असल्यासारखे वातावरण असते. प्रत्येक जंक्शन आणि मोकळ्या जागी शिवरायांचा पुतळा असायलाच हवा, असे बहुतांश शिवप्रेमींना वाटते. एका दृष्टीने ही भावना योग्यच आहे. कारण जगाच्या पाठीवर जे काही मोजकेच सर्वसमावेशक राज्यकर्ते होऊन गेले, त्यात शिवराय हे अग्रभागी आहेत. पण शिवरायांची पुरेशी ओळख अलीकडच्या काही वर्षांपर्यंत गोव्यातल्या अनेकांना नव्हती. काही संघटना, राजकीय पक्ष आदींच्या माध्यमातून विशिष्ट हेतूने म्हणा किंवा शिवरायांच्या कर्तृत्वाच्या जागरामुळे म्हणा, गोव्यात दर वर्षी शिवजयंती सोहळे आणि शिवरायांचे पुतळे उभारण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याला कोणीच नावे ठेवण्याचे कारण नाही. पण दिसली मोकळी जागा की उभार पुतळा, ही वृत्ती​ चुकीची आहे. मुरगाव पोर्ट अथोरिटीच्या (एमपीए) जागेत उभारलेल्या अशाच पुतळ्याचे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले आहे. हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर भाष्य करणे गैर ठरेल. पण ज्या शिवप्रेमाने प्रेरित होऊन आपण पुतळे उभारताे, त्या शिवरायांची नीती आपण प्रत्यक्षात अमलात आणतो का, हा विचार करणेही गरेचे आहे. राज्यात अनेक महामानवांचे हजारो पुतळे उभारले आहेत. पण या पुतळ्यांची देखभाल करण्याकडे आपले लक्ष आहे का, याचा विचार व्हायला हवा. केवळ जयंती, पुण्यतिथीला आपण जागे होऊन चालणार नाही. या महामानवांच्या विचारांचे बोट पकडून आपण पावले टाकायला हवीत. ज्या शिवरायांच्या सर्वसमावेशक राज्याचे चित्र आपण बखरींतून, शिवचरित्रांतून वाचतो, अनुभवतो ते प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्यापासून सुरुवात करायला हवी. केवळ पुतळे उभारून जबाबदारी पार पाडल्याच्या आविर्भावात कोणीही राहू नये. पुतळे उभारण्यामागची भावना चांगलीच आहे, पण त्याचा दिखाऊपणा होता नये. शिवविचारांचा जागर हा केवळ ‘वार्षिक उपचार’ राहता नये. वाळपईतील शिवप्रेमींचे याबाबत अनुकरण करायला हवे. त्या ठिकाणी दर महिन्याला शिवरायांना आदरांजली अर्पण केली जाते. समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी शिवविचारांचा जागर आवश्यक आहे. शिवजयंती साजरी करणार्‍या लोकप्रतिनिधींनी तर शिवनीतीच्या आधारे आत्मपरीक्षण करावे अशी स्थिती आहे. 

हल्लीच पणजीत आमदार वीरेश बोरकर आणि सांत आंद्रेवासीयांनी गोव्यातील लोकांच्या पाठिंब्यावर एक आंदोलन यशस्वी​ केले. टीसीपी कायद्यातील ३९ अ कलमातील तरतुदीनुसार पाळे शिरदोण येथील जमिनीचा झोन बदल केल्याच्या विरोधातील हे आंदोलन यशस्वी ठरले. आंदोलनात सर्व धर्म, जातींचे गोमंतकीय सहभागी झाले. या आंदोलनाची समाप्ती भावस्पर्शी झाली. श्री सातेरी देवीच्या मंदिरातून आणलेला प्रसाद आमदार बोरकर यांना नॉर्मा अल्वारिस यांच्या हस्ते खाऊ घालून आंदोलन मागे घेण्यात आले. गोव्याच्या जनमानसाचे हे प्रातिनिधिक उदाहरण. हीच गोव्याची खरी ओळख. ती जपायला हवी. तिला नख लावू पाहणाऱ्यांना आवरायला हवे आणि प्रेमाने समजावून सावरायलाही हवे. जाती-धर्मातील तेढ दूर करून समाज एकसंध करण्यासाठी दर वेळी करोना महासाथ येऊ शकत नाही. ती जबाबदारी माणसांचीच आहे. कुठल्या तरी संकुचित विचारधारेला शरण जाऊन समाजात तेढ निर्माण करण्याआधी विवेकबुद्धीने निर्णय घ्यायला हवा. तोच गोव्याला स्वतःची ओळख जपण्यासाठी उपयुक्त ठरेल. 

‘पुतळे धोरण’ गरजेचे!

राज्यातील धार्मिक घुमट्या, क्रॉससारखी प्रतिके व पुतळ्यांची एकूण संख्या आणि मोक्याच्या जागांवरील स्थान पाहता, याबाबत धोरणात्मक शासकीय निर्णयाची गरज निर्माण झाली आहे. पुतळे किंवा कोणत्याही धार्मिक प्रतिकांच्या उभारणीसाठी नियमावली निश्चित करायला हवी. पुतळ्यांची निगा कोण, कशी राखणार, विटंबनेसारखे प्रकार रोखण्यासाठी काय उपाययोजना शक्य आहेत, याचाही विचार सरकार पातळीवर व्हायला हवा. समूहाच्या भावनांवर थोडा जबाबदारीचा, नितीमत्तेचाही लगाम घालण्याची गरज आहे.


सचिन खुटवळकर 

(लेखक गोवन वार्ताचे 

वृत्त संपादक अाहेत..)