लोकांची दिशाभूल करणारे बंधारा ‘प्रेझेंटेशन’

दोन दिवसांत प्रकल्प रद्द न झाल्यास उग्र आंदोलन : आंदोलकांचा इशारा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th March, 11:28 pm
लोकांची दिशाभूल करणारे बंधारा ‘प्रेझेंटेशन’

सांगे : मिराबाग, सावर्डे येथे प्रस्तावित बंधाऱ्याच्या विरोधात गेले ३३ दिवस सांगे, कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघातील नागरिकांनी धरणे आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनानंतर तब्बल ३३ दिवसांनी सरकारला या प्रकल्पाबाबत लोकांसमोर माहिती देण्याची जाणीव झाल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार शनिवारी दुपारी ३ वाजता सावर्डे येथील श्रीस्थळ सभागृहात जलस्रोत खात्याच्या वतीने बंधारा प्रेझेंटेशन आयोजित करण्यात आले.

यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सांगे, कुडचडे आणि सावर्डे मतदारसंघातील सुमारे आठशे ते नऊशे बंधारा विरोधी नागरिक तसेच गोव्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सभागृहात उपस्थित होते.

बैठकीला जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर, अतिरिक्त अधीक्षक अभियंता अंकुश गांवकर, दिलीप नाईक, जिब्सन मिरांडा व जेसन मिनेझीस, सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप, काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रताप गांवकर, सांगेचे मामलेदार सिद्धार्थ प्रभू, धारबांदोडा मामलेदार मनोज कोरगांवकर तसेच काणकोणचे मामलेदार गजेश शिरोडकर आदी अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांनी बंधाऱ्याबाबत प्रेझेंटेशन सादर केले. मात्र या प्रेझेंटेशनमध्ये ठोस माहिती किंवा अभ्यास नसल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अभियंत्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे हे प्रेझेंटेशन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगत उपस्थितांनी तीव्र विरोध दर्शविला.

दरम्यान, अधीक्षक अभियंता अंकुश गांवकर यांनी सांगितले की, २०४७ पर्यंतच्या पाण्याच्या गरजांचा अभ्यास करण्यात आला असून प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तो लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या बैठकीत जे काही घडले त्याचा अहवाल सरकारपर्यंत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आंदोलनकर्ते संकेत भंडारी यांनी या प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे. सरकारने हा बंधारा तातडीने रद्द करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. त्यावेळी कायदा हातात घ्यायला आम्ही मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

प्रदीप काकोडकर यांनीही सरकारवर टीका करताना सांगितले की, बंधाऱ्याबाबत स्पष्ट उत्तर देण्यासाठी सरकारकडे काहीच नाही.

मॅश्यु डिकॉस्टा यांनी सांगितले की, बंधारा उभारला गेला तर संगमेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि गावाचे मोठे नुकसान होईल.

रामा काणकोणकर यांनी सांगितले की, बंधारा बांधून गाव नष्ट करण्याची गरज नाही. बिल्डर आणि कंपन्यांना पाणी पुरवण्यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. पाणीटंचाईचा प्रश्न असताना विहिरी आणि इतर जलस्रोत जपण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जलस्रोत खात्याच्या अभियंत्यांना या विषयाची पुरेशी माहिती नसून ते फक्त मंत्र्यांच्या आदेशानुसार काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

दोन दिवसांत प्रकल्प रद्द करा : आपा नाईक

आपा नाईक यांनी सांगितले की, गेले ३३ दिवस नागरिक बंधाऱ्याच्या विरोधात शांततेने आंदोलन करत आहेत. मात्र, पुढील दोन दिवसांत हा प्रकल्प रद्द झाला नाही, तर यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन उभारले जाईल. त्यावेळी परिस्थिती काय होईल हे सांगता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.


हेही वाचा