कारही जप्त; आंतरराज्य अमली पदार्थ व्यवसायात गुंतल्याचा संशय

पेडणे : गोव्यातील (Goa) मालपे-पेडणे (Pernem) येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ परिसरात पेडणे पोलिसांनी केलेल्या अमली पदार्थविरोधी कारवाईत १.६३७ किलो गांजासह (Ganja) दोघांना अटक केली. जप्त केलेल्या गांजाची बाजारातील किंमत सुमारे १.६४ लाख रुपये आहे.अटक करण्यात आलेले दोघेही चंदगड, कोल्हापूर, महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत.
पेडणे पोलिसांनी (Pernem Police) दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च रोजी सायंकाळी ७.५५ ते रात्री ११.०५ या दरम्यान मालपे, पेडणे येथील निलिमा रेस्टॉरंटजवळील एनएच-६६ रस्त्याच्या परिसरात अमली पदार्थांविरोधात छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान संशयितांच्या ताब्यातून हिरवट रंगाची वाळलेली पाने, बिया व देठ असलेला गांजा आढळून आला. हा गांजा त्यांनी एमएच-०९-जीयु-९१३४ क्रमांकाच्या मारुती एर्टिगा कारमध्ये लपवून ठेवला होता.
या प्रकरणात पोलिसांनी विनोद कुंभार (वय ३०, रा. राजगोळी खुर्द, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) आणि अतिक मलिक (वय २३, रा. तळगुली, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या दोघांना अटक केली. विनोद कुंभार हा व्यवसायाने चालक असून अतिक मलिक हा फॅब्रिकेटर असल्याचे समोर आले आहे.
छाप्यात १.६३७ किलो गांजा, ‘स्कायबॅग्स’ कंपनीची निळ्या रंगाची खांद्याची बॅग तसेच मारुती एर्टिगा कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी १४ मार्च रोजी पहाटे २.०६ वाजता पेडणे पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम २० (ब) (२) (बी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.
आंतरराज्य अमली पदार्थ व्यवसायात गुंतल्याचा संशय
प्राथमिक चौकशी केली असता; अटक करण्यात आलेले आंतरराज्य अमली पदार्थ व्यवसायात गुंतले असल्याचा संशय पेडणे पोलिसांनी व्यक्त केला आहे. पेडणे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रथमेश पार्सेकर व इतरांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन हळर्णकर, पोलीस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली पुढील तपास सुरू आहे.