मान्सून कालावधीतील आव्हानांसाठी रेल्वे प्रशासन सज्ज

मडगाव : कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) दुर्गम भूप्रदेशात पावसाळ्यात (Rain) येणारी आव्हाने आणि अतिवृष्टी लक्षात घेता, रेल्वे ऑपरेशन्स (Railway Operations) विस्कळीत होऊ नयेत यासाठी वार्षिक मान्सूनपूर्व तपासणी पूर्ण करण्यात आली.
कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या नेतृत्वाखाली पथकाकडून ही पाहणी करण्यात आली. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेल्वेची पायाभूत सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था किती सज्ज आहे, याचा आढावा १० व ११ मार्च रोजी झा यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून घेण्यात आला.
कोकण रेल्वेचा मार्ग डोंगरातून जात असल्याने याठिकाणी मुसळधार पाऊसही पडतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी वार्षिक तपासणी केली जाते. १० मार्च रोजी मडगाव (Margao) ते ठोकूर या विभागाची तपासणी करण्यात आली तर ११ मार्च रोजी मडगाव ते रोहा (Roha) या विभागातील तांत्रिक सुविधा, रेल्वे रुळासह इतर आवश्यक तपासणी व सखोल पाहणी करण्यात आली. या आढावा दौर्यात व्यवस्थापकीय संचालक झा आणि वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध बाबींचा आढावा घेतला.
या संवेदनशील ठिकाणांची पाहणी करत रेल्वे मार्गावर दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणे आणि उतार यांची पाहणी केली व आवश्यक उपाययोजना सुचवण्यात आल्या. पायाभूत सुविधांमध्ये रेल्वे मार्ग, पूल, बोगदे आणि सिग्नल यंत्रणेची स्थिती तपासणी करण्यात आली.
रेल्वे मार्गावर ज्या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्याची भीती आहे, तिथे केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची चाचपणी करत पाणी निचरा होत असल्याची खात्री करून घेतली. याशिवाय स्टेशनवरील पायाभूत सुविधा आणि सौर ऊर्जा प्रकल्पांची कार्यक्षमता याची पडताळणीही करण्यात आली.
सध्या सुरू असलेल्या देखभालीच्या कामांचा वेग वाढवून पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व सुरक्षा उपाय पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेले आहेत. या वार्षिक तपासणीमुळे कोकण रेल्वेची पावसाळ्यातील सज्जता अधोरेखित झाली व रेल्वे प्रशासन मान्सून कालावधीतील आव्हानांसाठी सज्ज झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.