खाण पट्ट्यातील एकही मंदिर पाडू देणार नाही : मुख्यमंत्री

बफर झोनचे काटेकोर पालन करण्याचे खाण कंपन्यांना आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:59 pm
खाण पट्ट्यातील एकही मंदिर पाडू देणार नाही : मुख्यमंत्री

पणजी : राज्यातील खनिज लीज ब्लॉकमध्ये एकही मंदिर पाडले जाणार नाही, तसेच देवळांच्या परिसरात खाणकामाला परवानगी दिली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. बफर झोन व संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्यासाठी खाण कंपन्यांना सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.‍‍‍शून्य प्रहरादरम्यान हा मुद्दा उपस्थित करताना फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले की, नुकत्याच मंजूर झालेल्या काही खनिज लीज ब्लॉकमध्ये घरे, देवळे आणि शेती क्षेत्राचा समावेश आहे. तसेच जवळील जलस्रोत आणि पर्यावरण संवेदनशील भागांनाही यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.
सदर लीज ब्लॉकमध्ये सुमारे २०० घरे, मुळगाव ग्रामदेवी मंदिर, श्री केळबाई मंदिर, सातेरी मंदिर तसेच महादेव मंदिर आणि कृषी क्षेत्र असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कुडणे ब्लॉकमध्ये रुद्रेश्वर देवस्थान आणि लासगास-हरवळे परिसरातील पाणलोट क्षेत्र असल्यामुळे खाणकामामुळे स्थानिक लोक व देवळांना धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय नव्या ब्लॉकच्या लिलावामुळे काही प्राचीन देवळांवरही संकट येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले...
* विजय सरदेसाई यांनी आपणच देवाचे कैवारी आहोत, असे भासवू नये.
* राज्य सरकार कोणतेही मंदिर पाडण्यास परवानगी देणार नाही. सर्व मंदिरे लीज क्षेत्राबाहेर अाहेत.
* रुद्रेश्वर मंदिर ते धबधब्यापर्यंतचा परिसर मायनिंग ब्लॉकच्या बाहेर आहे.
* मंदिरांच्या ५० मीटर बफर झोनमध्ये खाणकाम किंवा खनिज उत्खननास परवानगी दिली जाणार नाही.
* ही मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळली जातील यासाठी खाण विभागाने संबंधित कंपन्यांना पत्र जारी केले आहे.

हेही वाचा