बर्चप्रकरणी लुथरा बंधूंना न्यायालयाचे अंतरिम संरक्षण

अबकारी परवान्यासाठी आरोग्य केंद्राचा बनावट एनओसी केल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:48 pm
बर्चप्रकरणी लुथरा बंधूंना न्यायालयाचे अंतरिम संरक्षण

म्हापसा : बर्च बाय रोमिओ लेन क्लबसाठी अबकारी खात्याचा (उत्पादन शुल्क) परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राचा बनावट नाहरकत दाखला (एनओसी) तयार करण्याच्या गुन्ह्यात लुथरा बंधूंना न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. दोन्ही संशयितांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू असून या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यास म्हापसा पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

साकवाडी हडफडे येथील सर्व्हे क्र. १५९/० मधील घर क्रमांक ५०२/१ मध्ये चालणाऱ्या जीएस हॉस्पिलिटी एलएलपीच्या बर्च रोमिओ बाय लेन क्लबसाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी आरोग्य केंद्राची बनावट एनओसी तयार करून फसवणूक व बनावटगिरी प्रकरणी क्लबचे मालक गौरव लुथरा, सौरभ लुथरा व अजय गुप्ता यांच्याविरुद्ध म्हापसा पोलिसांनी १७ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंद केला होता. हा फसवणूक व बनावटगिरीचा प्रकार १३ डिसेंबर रोजी हणजूण पोलिसांच्या बर्च अग्नितांडव दुर्घटनेच्या तपासावेळी आढळून आला होता.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी याबाबत तक्रार दिली होती. संशयित आरोपींनी समान हेतूने जाणूनबुजून आणि अप्रामाणिकपणे कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे बनावट नाहरकत प्रमाणपत्र तयार केले. यात संशयितांनी आपली बोगस सही व रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर केला. नंतर हा बनावट दाखला खरा असल्याचे भासवून तो उत्पादन शुल्क खात्याकडे सादर केला. जेणेकरून उत्पादन शुल्क परवान्यासाठी कागदोपत्री व्यवहार पूर्ण करता येईल. त्यानंतर संशयित उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यात यशस्वी झाले. फिर्यादी तसेच अबकारी अधिकाऱ्यांची त्यांनी फसवणूक केली. या तक्रारीनुसार वरील संशयित आरोपी व त्यांच्या कंपनीविरुद्ध भा. न्या. संहितेच्या ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) व ३(५) कलमान्वये म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

पोलिसांनी संशयित गुप्ता यांची १० दिवस पोलीस कोठडीत चौकशी केली होती. परंतु त्याच्याकडून पोलिसांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही.

दरम्यान, या प्रकरणात तिन्ही संशयित आरोपींची चौकशी करण्यासाठी हस्तांतरण पद्धतीने त्यांना आपल्या स्वाधीन करण्यात यावे, अशा आशयाचा विनंती अर्ज म्हापसा पोलिसांनी म्हापसा न्यायालयात सोमवारी केला आहे. अजय गुप्ता याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल्याने न्यायालयाकडून त्याची म्हापसा पोलिसांकडे हस्तांतर करण्याचा आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अजय गुप्ता यांना २३ डिसेंबर रोजी अटक केली होती. तर ७ फेब्रुवारी रोजी जामीन अर्ज मंजूर झाला होता. १० दिवस पोलीस तर नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. 

हेही वाचा