कार रस्त्यावर उलटल्याने चालक जखमी

वास्को : सासमोळे बायणा येथे गुरुवारी पहाटे चारच्या दरम्यान झालेल्या अपघातात एका कारने तीन वाहनांना धडक दिली. कार रस्त्यावर उलटल्याने कारचालक जखमी झाला. अपघातात तीन वाहनांचे व अपघातग्रस्त कारचे नुकसान झाले.
गुरुवारी पहाटे एक कार सासमोळे भागाकडे चालली होती. कार भरधाव वेगात असल्याने कारचालकाचे अचानकपणे नियंत्रण सुटल्याने कारने तेथे रस्त्याकडेला असलेल्या दोन दुचाकींना धडक दिली. त्यानंतर कार तशीच पुढे जाऊन तेथे उभ्या असलेल्या चारचाकीवर धडकली. जोरदार धडकेने कार तेथेच उलटली. सदर कारचालकाला हाताला व इतर ठिकाणी मार लागला. याप्रकरणी वास्को पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तेथे येऊन सदर कार रस्त्यावरून हटवून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला.
सासमोळे येथील रस्ते अतिशय अरुंद असल्याने तेथे वाहनांच्या वेगावर आळा घालण्यासाठी गतीरोधक उभारण्याची मागणी होत आहे. यापूर्वी अनेकवेळा सदर मागणी करूनही अद्याप तेथे गतीरोधक उभारण्यात आले नसल्याबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली. भविष्यात अशाप्रकारचे अपघात तेथे होऊ नयेत यासाठी तेथे गतीरोधक उभारण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली.