चार वर्षांत ६५७ दुचाकी चालकांचा मृत्यू

स्वयंअपघातात ३९६ जणांचा मृत्यू : अपघातसंबंधी २,१७६ गुन्हे दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:45 pm
चार वर्षांत ६५७ दुचाकी चालकांचा मृत्यू

पणजी : राज्यात १ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ पर्यंत अपघाती मृत्यू आणि अपघात संदर्भात २,१७६ गुन्हे दाखल झाले आहेत. यात ६५७ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला. त्यानुसार, ही आकडेवारी ३०.१९ टक्के एवढी आहेत. तसेच वरील काळात स्वयंअपघातात ३९६ जणाचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी १८.१९ टक्के आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे.


या संदर्भात कुडतरीचे आमदार आलेक्स लाॅरेन्स यांनी तारांकित लेखी प्रश्न विचारला होता. त्यानुसार, त्यांनी राज्यात मागील चार वर्षांत नोंद झालेल्या अपघाती गुन्ह्याची माहिती मागितली होती. त्यानुसार, २०२२ मध्ये ५४८ अपघात, २०२३ मध्ये ५३९, २०२४ मध्ये ५१८, २०२५ मध्ये ५२८ तर ३१ जानेवारी पर्यंत ४३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात २०२२ मध्ये १६७ दुचाकी चालकांचे मृत्यू झाले. तसेच २०२३ मध्ये १५२, २०२४ मध्ये १७१, २०२५ मध्ये १५८, तर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ९ दुचाकी चालकांचे मृत्यू झाले.

याशिवाय वरील कालावधीत ३९६ जणांचे स्वयंअपघातात मृत्यू झाले आहे. त्यानुसार, २०२२ मध्ये ९६, २०२३ मध्ये ११०, २०२४ मध्ये ९४, २०२५ मध्ये ९१, तर ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ५ जण स्वयंअपघातात मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.             

हेही वाचा