‘पाकिस्तानी ड्रेस’ च्या जाहिरातीवरून वाळपईत तणाव

देशप्रेमी नागरिकांनी पोलीस ठाण्यावर धडक देत केली कारवाईची मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th March, 11:30 pm
‘पाकिस्तानी ड्रेस’ च्या जाहिरातीवरून वाळपईत तणाव

वाळपई : वाळपई नगरपालिकेच्या (Valpoi Municipal Council) बाजार क्षेत्रात वाळपई-ठाणे रस्त्यावर असलेल्या एका दुकानात ‘पाकिस्तानी ड्रेस’ (Pakistani Jersey) विक्रीसंदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी मोठ्या प्रमाणात देशप्रेमी नागरिकांनी वाळपई पोलीस ठाण्यावर धडक देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

यावेळी नागरिकांनी वाळपई नगरपालिकेने सदर दुकानाचे ट्रेड लायसन्स तसेच इतर परवाने रद्द करावेत, अशी मागणी केली. प्राप्त माहितीनुसार, संबंधित दुकानमालकाला वाळपई पोलिसांनी चौकशीसाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता पोलीस स्थानकावर हजर राहण्यास सांगितले आहे.

वाळपई-ठाणे मार्गावरील अलगौसिया मशिदीसमोर असलेल्या एका दुकानावर ‘पाकिस्तानी ड्रेस उपलब्ध’ असल्याची जाहिरात करणारा फलक लावण्यात आला होता. तसेच हा फलक समाजमाध्यमांवरही व्हायरल करण्यात आला. गेल्या चार दिवसांपासून समाजमाध्यमांवर हा फलक व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तान या देशाशी संबंधित गोष्टींचा भारतात प्रचार होणे हे देशाच्या अस्मितेला धक्का देणारे असल्याचा दावा देशप्रेमी नागरिकांनी केला आहे.

ऋषभ मयेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी गुरुवारी वाळपई पोलीस ठाण्यावर धडक देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी व भविष्यात अशा प्रकारचे धाडस कोणीही करू नये यासाठी सतर्क राहावे, अशी मागणी नागरिकांनी केली.

वेळीच आवरा, अन्यथा...

ऋषभ मयेकर व इतरांनी सांगितले की, वाळपईसारख्या शांत भागामध्ये अशा प्रकारची जाहिरात करून नागरिकांमध्ये संताप निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. वाळपई पालिका व पोलिसांनी या घटनेबाबत गांभीर्याने पावले उचलावीत, अन्यथा वाळपई परिसरातील वातावरण बिघडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

हेही वाचा