पीडिता अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीला अर्थ राहत नाही!

पॉक्सो न्यायालयाचे निरीक्षण : संशयिताविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
12th March, 11:53 pm
पीडिता अल्पवयीन असल्यास तिच्या संमतीला अर्थ राहत नाही!

पणजी : पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संशयिताने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले होते. तसेच पीडित अल्पवयीन असल्यामुळे तिच्या संमतीला काही अर्थ राहत नाही, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित युवकाविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला आहे. याबाबतचा आदेश पणजी येथील पाॅक्सो न्यायालयाच्या न्या. पूजा कवळेकर यांनी दिला

या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी २०२५ मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार, पीडित मुलगी अल्पवयीन अाहे. संशयित आणि तिची मैत्री असून मार्च आणि जून २०२५ मध्ये संशयिताने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. यात ती गरोदर होऊन मुलाला जन्म दिला. या प्रकरणी कुडचडे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित युवकाला अटक करून कारवाई केली. त्यानुसार, पोलिसांनी तपासपूर्ण करून संशयिताविरोधात पाॅक्सो न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. संशयित युवकाने न्यायालयात अर्ज करून आरोपातून सुटका करण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयित आणि पीडित मुलगी अनेक वर्षांपासून मित्र होते. तसेच त्यांच्यातील लैंगिक संबंध स्वेच्छेने होते. तसेच या संदर्भात पीडित मुलीने जबाब नोंद केला आहे. असा युक्तिवाद संशयिताच्या वकिलाने केला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयिताविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश जारी केला. 

हेही वाचा