गोव्यात घरगुती एलपीजी पुरवठा सुरळीत, व्यावसायिक वापरासाठी निर्बंध!

तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्य सचिवांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
53 mins ago
गोव्यात घरगुती एलपीजी पुरवठा सुरळीत, व्यावसायिक वापरासाठी निर्बंध!

पणजी: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह गोव्यात निर्माण झालेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या वापरासाठी कोणताही तुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेत सरकारने व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर काही प्रमाणात निर्बंध लादले आहेत. राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीत ही माहिती दिली असून जनतेने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्य सचिवांनी इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तिन्ही प्रमुख कंपन्यांच्या प्रतिनिधींसह नागरी पुरवठा खाते, पोलीस प्रशासन आणि दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील गॅस साठ्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. घरगुती ग्राहकांसोबतच शैक्षणिक संस्था, रुग्णालये आणि संरक्षण आस्थापनांसाठी गॅस पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध नसतील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. घरगुती पुरवठा अखंडित राहावा यासाठीच व्यावसायिक वापरासाठी तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत.

नागरिकांमध्ये अफवा पसरू नयेत आणि योग्य माहिती पोहोचावी यासाठी उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत जनजागृती करण्याचे निर्देश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच गॅस वितरण प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी वितरण केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी गॅस खरेदीसाठी किंवा बुकिंगसाठी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा