युरी आलेमाव : सरकारला आश्वासनाचा विसर पडल्याची टीका

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी ओबीसी विद्यार्थ्यांना १०० पॉइंट रोस्टरनुसार आरक्षण लागू करण्याचे सरकारने आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. आगामी नीट पीजी परीक्षेपूर्वी हे आरक्षण लागू करण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत केली.
विधानसभेतील शून्य प्रहरादरम्यान आलेमाव यांनी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील जागांवरील आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयातील पोस्टग्रॅज्युएट मेडिकल सीट्ससाठी ओबीसी विद्यार्थ्यांना १०० पॉइंट रोस्टरनुसार आरक्षण लागू करण्याबाबतची अधिसूचना एका आठवड्यात काढण्याचे आश्वासन सरकारने ४ ऑगस्ट २०२५ रोजी विधानसभेत दिले होते. मात्र आजपर्यंत ती अधिसूचना जाहीर करण्यात आलेली नाही.
तसेच ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गांसाठी १०० टक्के रोस्टरआधारित आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक नियमही अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले. गेल्या सहा वर्षांत या समुदायांना वारंवार आश्वासने देण्यात आली, परंतु या विषयावर सरकारकडून सातत्याने विलंब होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या नीट पीजी वैद्यकीय नोंदणीच्या पार्श्वभूमीवर ही अधिसूचना तातडीने जाहीर करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे, असा प्रश्नही आलेमाव यांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या संदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली.