दिवस पाचवा : आज विधानसभेच्या पटलावर आज समाजकल्याण, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल. तसेच नदी वहन, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि दिव्यांग सक्षमीकरणाबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर सरकारकडून उत्तर दिले जाईल.

LIVE UPDATES : सकाळचे सत्र
१.०६ : डिपॉजिट रिफंड योजनेमुळे सरकारवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही. यामुळे गोवा स्वच्छ राहण्यास मदत होईल. सर्व भागधारकांना विश्वासात घेऊनच ही योजना सुरू केली जाईल. यासाठी एक वर्षांचा कालावधी लागू शकतो : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
१२.३८ : 'माझे घर' योजनेसाठी कोमुनिदाद दाखला व इतर कागदपत्रे सादर करण्याच्या अंतिम मुदतीत एका वर्षाची मुदतवाढ : डॉ प्रमोद सावंत,मुख्यमंत्री
११.५० गोव्यातील २,००० किमी जुन्या जलवाहिन्यांपैकी २७६ किमी बदलण्याचे काम सुरू झाले असून, उर्वरित काम ३ वर्षांत पूर्ण होईल. सध्या २६% जनतेला २४ तास पाणी मिळत आहे : सुभाष फळदेसाई, पेयजल मंत्री.
गोव्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने ६,००० किलोमीटरपैकी ४० वर्षे जुन्या असलेल्या २,००० किलोमीटर जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यातील २७६ किमीचे काम सुरू असून उर्वरित काम तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल, अशी माहिती पेयजल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत दिली.
सध्या राज्याला दररोज ६५ दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी डिसेंबर २०२६ पर्यंत पाण्याची उपलब्धता १,००० MLD पर्यंत वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या १,२०० कोटींच्या प्रकल्पासाठी केंद्राकडे निधीची मागणी करण्यात आली आहे. गळती रोखण्यासाठी आता डिजिटल फ्लो मीटर्स बसवले जाणार आहेत. तसेच, आपत्कालीन स्थितीसाठी प्रत्येक ग्राहकाने तीन दिवसांचा पाणीसाठा राखीव ठेवावा, असे आवाहनही मंत्र्यांनी केले आहे. सध्या केवळ २६% जनतेला २४ तास पाणी मिळत असून, नवीन नियोजनामुळे हा टक्का वाढणार आहे.
११.३४ : घरगुती गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध; व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा आहे. समस्या लवकरच सुटणार. लोकांनी घाबरण्याची गरज नाही : डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री. सिलिंडर टंचाईच्या मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ.
गोव्यात सध्या सुरू असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या कथित टंचाईवरून निर्माण झालेली भीती अनाठायी असून, राज्यात घरगुती गॅसचा मुबलक साठा उपलब्ध आहे, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत दिले. व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात काही प्रमाणात अडथळे आले असले, तरी ही समस्या लवकरच मार्गी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
गॅस एजन्सीबाहेर लागणाऱ्या रांगा आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, घरगुती वापराच्या सिलिंडरचा कोणताही तुटवडा नाही. केवळ व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, यासंदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सरकार विशेष उपाययोजना करत आहे. विरोधकांनी गॅस टंचाईवरून गदारोळ केला असला, तरी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.