
पणजी: गोव्यातील वेश्याव्यवसायाबाबत जाहिरात देणाऱ्या सर्व वेबसाईट्स या प्रामुख्याने सायबर फसवणुकीसाठीच तयार करण्यात आल्या आहेत आणि त्या सर्व राज्याबाहेरून चालवल्या जात आहेत. राज्यात अशा प्रकारच्या व्यवसायांचे प्रमाण जेवढे भासवले जाते, तेवढे मोठे नाही. तरीही पोलिसांतर्फे अशा कृत्यांवर कडक कारवाई केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते उत्तर देत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, इंटरनेटवर 'एस्कॉर्ट सर्विस इन गोवा' असे सर्च केल्यास अनेक वेबसाईट्स उघडतात, मात्र त्या सर्व बनावट आहेत. या वेबसाईट्स पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड किंवा केनियासारख्या ठिकाणांहून चालवल्या जातात. या वेबसाईट्सवर संपर्क साधला असता आधी पैशांची मागणी केली जाते आणि पैसे मिळाल्यावर दिलेले संपर्क क्रमांक बंद केले जातात. हा निव्वळ सायबर फसवणुकीचा प्रकार असून, गोवा पोलिसांनी 'डमी ग्राहक' बनून याची खात्री केली आहे.
राज्यातील कारवाईचा आढावा घेताना मुख्यमंत्री म्हणाले की, असे धंदे राज्यात पूर्णपणे बंद आहेत असे आम्ही म्हणत नाही, मात्र त्याचे प्रमाण मर्यादित आहे. मागील दोन वर्षांत सायबर पोलिसांनी ५१२ वेबसाईट्स बंद केल्या असून २२ जणांवर एफआयआर दाखल केले आहेत. मानवी तस्करीच्या १६ प्रकरणांत ३६ जणांना अटक करण्यात आली असून ४२ महिलांची सुटका केली आहे. तसेच, राज्यात हरवलेली मुले सापडण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून अधिक आहे. राज्य सरकार असे प्रकार खपवून घेणार नाही, मात्र विरोधकांनी यावर बोलताना राज्याची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी.
तत्पूर्वी, युरी आलेमाव यांनी वेश्याव्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या हॉटेल्सचे सर्व परवाने रद्द करण्याची मागणी केली. मानवी तस्करीत गोवा देशात आघाडीवर असल्याचा दावा करत त्यांनी मुख्य सूत्रधारांना पकडण्याची गरज व्यक्त केली. आमदार वेंझी व्हिएगस यांनी यासंदर्भात 'विशेष कृती दल' (SIT) स्थापन करण्याची आणि पीडितांचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली.
१८ जून रस्त्यावर १८ स्पा
आमदार विजय सरदेसाई यांनी राज्यातील वाढत्या 'स्पा' संस्कृतीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, गोव्याच्या क्रांती दिनाची आठवण म्हणून ज्या रस्त्याला '१८ जून मार्ग' असे नाव देण्यात आले आहे, तिथे आज १८ स्पा सुरू झाले आहेत. सरकारने या वाढत्या प्रमाणाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.