‘चेक्ड बाय दोतोर’ : ६ हजारांहून अधिक महिलांची तपासणी

राज्य सरकारची मोहीम : जिल्हा इस्पितळ, प्राथमिक, सामुदायिक आरोग्य केंद्र, गोमेकॉमध्ये मोफत तपासणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th March, 11:56 pm
‘चेक्ड बाय दोतोर’ : ६ हजारांहून अधिक महिलांची तपासणी

पणजी : राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘चेक्ड बाय दोतोर’ या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमाअंतर्गत ८ ते १० मार्च दरम्यान ६,४६७ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांना ११ विविध प्रकारच्या आजारांसाठी तपासण्यात आले. काही महिलाना लस, औषधे देण्यात आली. राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी ही मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ४० वर्षांवरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी ५,००९ महिलांची चाचणी करण्यात आली. मधुमेहासाठी ४,७३०, स्तनांच्या कर्करोगासाठी २,४५६, तोंडाच्या कर्करोगासाठी ३,२५७, अॅनिमियासाठी ३,२२५ तर युरिन इन्फेक्शनसाठी १,४२३ महिलांची तपासणी करण्यात आली. ५४ महिलांना टीडी, तर १२ मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. ८७३ महिलांना आयर्नच्या गोळ्या देण्यात आल्या. ४२९ महिलांना सॅनिटरी पॅड देण्यात आले आहेत.

मोहिमेदरम्यान १,३७५ महिलांचे कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करण्यात आले. ४१३ गर्भवती आणि १२२ बाळाला जन्म दिलेल्या महिलांची तपासणी करण्यात आली. २,४९५ महिलांनी आयुष ओपीडी सेवांचा लाभ घेतला. ३३९ महिलांची पीएपीसाठीची तपासणी झाली. २,८२५ महिलांचे विविध विषयांसाठी समुपदेशन करण्यात आले. ही मोहीम ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. यानुसार दोन्ही जिल्हा इस्पितळ, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्र आणि गोमेकॉमध्ये मोफत तपासणी सुरू आहे.

मोहिमेत काही खासगी रुग्णालयांचाही समावेश करून घेण्यात आला आहे. या रुग्णालयांत सवलतीच्या दरात तपासण्या केल्या जाणार आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. सामान्यतः या तपासण्यांसाठी ८ ते १० हजार रुपये खर्च येतो. मात्र मोहिमेअंतर्गत खासगी इस्पितळात अत्यंत अल्प दरात या तपासण्या केल्या जातील. अनेक महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. वेळेत तपासणी करून भविष्यातील आजार टाळण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

६७७ महिला अॅनिमिक

तीन दिवसांत राज्यातील ६७७ महिलांना अॅनिमिया असल्याचे आढळून आले आहे. २६७ महिलांचे सँपल टीबीच्या अत्याधुनिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचा