होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला; कच्च्या तेलाचा दर १०० डॉलर्सकडे

युद्ध जिंकल्याचा ट्रम्पचा दावा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला; कच्च्या तेलाचा दर १०० डॉलर्सकडे

तेहरान : मध्यपूर्वेतील संघर्ष तीव्र होत असताना जागतिक तेलबाजारात मोठी खळबळ उडाली आहे. होर्मुझ (Strait of Hormuz) सामुद्रधूनी परिसरातील हल्ल्यांमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होत असून जागतिक बाजारात तेलाच्या किमती पुन्हा १०० डॉलर्स प्रति बॅरलच्या दिशेने झेपावल्या आहेत.  संघर्ष सुरू असतानाही तेहरानने (Tehran) सुमारे १३.३ दशलक्ष बॅरल तेल निर्यात केल्याचे समोर आले आहे.

युद्धाला १३ दिवस पूर्ण होत असताना अमेरिका, इस्त्रायल आणि  (United States, Israel, Iran) यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. बेरुत (Beirut) येथे जोरदार हवाई हल्ले झाले तर तेहरान (Tehran)  मध्ये ड्रोन हल्ल्यांनी सुरक्षा चौक्यांना लक्ष्य केले.

टँकरवर हल्ले, समुद्रात भीषण आग

पर्श‌ियन गल्फच्या (Persian Gulf )  उत्तरेकडील भागात एका तेलवाहू टँकरवर हल्ला झाल्याने मोठी आग लागल्याचे दिसून आले. तसेच होर्मुझ  सामुद्रधुनीजवळ तीन मालवाहू जहाजांवर हल्ले झाले.  या हल्ल्यांपैकी एका हल्ल्याची जबाबदारी इराणने स्वीकारली. 

इराणचा इशारा; तेल पुरवठ्याला धोका

इराणने इशारा दिला आहे की, गरज पडल्यास होर्मुझ सामुद्रधूनी मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. जगातील जवळपास पाचव्या भागाची तेल वाहतूक या मार्गाने होते. त्यामुळे या मार्गावरील तणावामुळे जागतीक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे.

जागतिक साठ्यातून तेल सोडण्याचा निर्णय

जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय एनर्जी एजंसीच्या (International Energy Agency) ३२ 32 सदस्य देशांनी एकत्रितपणे धोरणात्मक साठ्यातील ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही बाजारातील तणाव कायम असून अमेरिकेत पेट्रोलच्या किमती सलग ११व्या दिवशी वाढल्या आहेत.

अमेरिका, इस्त्रायलशी संबंधित बँका, शहरांना इशारा

इराण सैन्याच्या खातम अल-अनबीया सेंट्रल हेडक्वार्टर्सने ( Khatam al-Anbiya Central Headquarters)  आखाती देशांतील अमेरिकेशी आणि इस्रायलशी संबंधित बँका व आर्थिक केंद्रे ही लष्करी लक्ष्य असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुबई, मानमा, कुवेत शहर येथील नागरिकांना बँकांपासून किमान १ किमी दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सिटीग्रुप आणि एचएसबीसी  यांनी आखाती भागातील काही कार्यालये तात्पुरती बंद केली.

रशियाकडून ड्रोन रणनीती

पश्चिमी गुप्तचर संस्थांच्या माहितीनुसार रशिया (Russia) इराणला ड्रोन हल्ल्यांसाठी प्रगत तंत्रज्ञान व रणनीती देत आहे. व्होलोदीमीर झेलेंस्की यांनीही रशिया इराणला ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि हवाई संरक्षणासंबंधी मदत करत असल्याचा दावा केला आहे.

कुवेतमध्ये ड्रोन हल्ले रोखले

कुवेतच्या हवाई संरक्षण दलाने आज पहाटे देशाच्या उत्तरेकडील हवाई क्षेत्रात घुसलेल्या अनेक शत्रू ड्रोनना पाडल्याचे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

 “युद्ध आम्ही जिंकलो” : ट्रम्पचा दावा 

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump) यांनी एका सभेत इराणविरुद्धचे युद्ध “आम्ही जिंकलो” असा दावा केला. त्यांनी जागतिक बाजार स्थिर ठेवण्यासाठी तेल साठा बाजारात सोडण्याच्या आंतरराष्ट्रीय कराराचा उल्लेखही केला.

टँकरवरील हल्ल्यानंतर बचावकार्य

इराकातील समुद्रात विदेशी तेलवाहू टँकरवर हल्ला झाल्यानंतर ३८ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. या घटनेत किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच ओमानमधील एका बंदरात इराणी ड्रोनने इंधन टँकवर हल्ला केल्याचा व्हिडिओही समोर आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेतील तणाव अधिकच वाढला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठा आणि बाजारपेठांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा