जम्मूतील गोळीबारात फारूक अब्दुल्ला,उपमुख्यमंत्री सुरिंदर थोडक्यात बचावले

फारूक अब्दुल्ला गेली २० वर्षे संशयिताच्या निशाण्यावर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
36 mins ago
जम्मूतील गोळीबारात फारूक अब्दुल्ला,उपमुख्यमंत्री सुरिंदर थोडक्यात बचावले

जम्मू : जम्मूमधील ग्रेटर कैलाश परिसरातील रॉयल पार्कजवळ बुधवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेत नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला (Farooq Abdullah)  आणि जम्मू-काश्मीरचे (Jammu and Kashmir) उपमुख्यमंत्री सुरिंधर चौधरी ( Surinder Choudhary) थोडक्यात बचावले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर कैलाश येथील रॉयल पार्क परिसरात एका खासगी लग्न समारंभात दोन्ही नेते उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते बाहेर पडत असतानाच अचानक गोळीबार झाला. गोळीबाराचा आवाज होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात घेतली. सुदैवाने या घटनेत दोन्ही नेत्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

या प्रकरणातील संशयित आरोपीची ओळख कमल सिंह जमवाल अशी आहे. घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात आले.

सूत्रांच्या माहितीनुसार, संशयिताने चौकशीदरम्यान सांगितले की तो मागील सुमारे २० वर्षांपासून फारूक अब्दुल्ला यांना ठार मारण्याचा विचार करत होता. या खुलाशानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरातील (Jammu and Kashmir Police)  वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी एकूण प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे.  या घटनेमुळे जम्मूमधील व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा