इराणात हवाई हल्ल्यांनंतर ‘काळ्या पावसाचा वर्षाव’; विषारी प्रदूषणाची भीती वाढली

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
35 mins ago
इराणात हवाई हल्ल्यांनंतर ‘काळ्या पावसाचा वर्षाव’; विषारी प्रदूषणाची भीती वाढली

मेलबर्न / तेहरान : इराणमधील (Iran) तेलसाठ्यांवर झालेल्या अमेरिका-इस्त्रायली हवाई हल्ल्यानंतर (US-Israeli airstrikes) काही भागांत ‘काळा पाऊस’ (black rain) किंवा आम्लवर्षाव होत असल्याची माहिती समोर आली आहे. या पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणावर विषारी प्रदूषण पसरल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

पर्यावरण शास्त्रज्ञांच्या मते, हा पाऊस केवळ आम्लयुक्त नसून; त्यात अनेक धोकादायक रासायनिक घटक मिसळलेले असण्याची शक्यता आहे. हल्ल्यानंतर इराणमधील काही रहिवाशांनी डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास तसेच इमारती आणि वाहनांवर तेलमिश्रित काळ्या पावसाचे थेंब पडत असल्याची तक्रार केली आहे.

इराणच्या रेड क्रेसेंट सोसायटीनेही (Iran’s Red Crescent Society) या हल्ल्यानंतर होणारा पाऊस “अत्यंत धोकादायक आणि आम्लयुक्त” असू शकतो, असा इशारा दिला आहे.

वातावरणीय रसायनशास्त्रज्ञांच्या मते, तेलसाठ्यांवरील बॉम्बहल्ल्यांमुळे प्रचंड प्रमाणात विषारी धूर आणि प्रदूषक हवेत पसरले. पावसाचे थेंब हे प्रदूषक गोळा करून जमिनीवर आणतात. त्यामुळेच काळ्या रंगाचा पाऊस पडत असल्याचे संकेत मिळत आहेत.

धोकादायक रसायनांचा संभव

तज्ज्ञांच्या मते या पावसामध्ये हायड्रोकार्बन, अतिसूक्ष्म कण (पीएम२.५) (PM2.5),  कर्करोगकारक पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (पीएएचएस) (PAHs) यांसारखे घटक असू शकतात. याशिवाय स्फोट आणि आगीतून निर्माण झालेले जड धातू, अजैविक संयुगे आणि इमारतींच्या साहित्यांमधील रसायने देखील पावसात मिसळली असण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

तेलसाठ्यांवरील आगीतून मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड हवेत सोडले जातात. हे वायू पाण्याशी अभिक्रिया करून सल्फ्युरिक आणि नायट्रिक आम्ल तयार करतात आणि त्यामुळेच आम्लवर्षाव होतो.

आरोग्यावर गंभीर परिणाम

तज्ज्ञांच्या मते या काळ्या धुरामुळे आणि पावसामुळे अल्पकालीन आणि दीर्घकालीन आरोग्याचे धोके निर्माण होऊ शकतात.

डोकेदुखी आणि श्वसनाचा त्रास

दमा किंवा फुफ्फुसांच्या आजारांमध्ये वाढ

गर्भवती महिलांमध्ये कमी वजनाची बाळे जन्माला येण्याची शक्यता

दीर्घकाळ या प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्यास कर्करोग, मेंदूशी संबंधित आजार आणि हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो.

पर्यावरणावरही परिणाम

पावसामुळे हे विषारी घटक नदी-नाले आणि जलस्रोतांमध्ये मिसळू शकतात, ज्यामुळे जलीय जीवसृष्टी आणि पिण्याच्या पाण्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच हे घटक इमारती, रस्ते आणि पृष्ठभागांवर साचून नंतर पुन्हा हवेत मिसळू शकतात.

तज्ज्ञांनी लोकांना मास्क वापरणे, शक्यतो घरातच राहणे, दरवाजे-खिडक्या बंद ठेवणे आणि पृष्ठभाग स्वच्छ ठेवणे असा सल्ला दिला आहे. मात्र युद्धाच्या परिस्थितीत या उपायांची अंमलबजावणी करणे स्थानिकांसाठी कठीण ठरत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.



हेही वाचा