
नवी दिल्ली: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे सावट आता भारतीय स्वयंपाकघरापर्यंत पोहोचले आहे. वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला इंधन तुटवडा आणि गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या बुकिंग संदर्भातील नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, आता ग्राहकांना एका सिलिंडरनंतर दुसरा सिलिंडर बुक करण्यासाठी किमान २५ दिवसांचा कालावधी वाट पाहावी लागणार आहे. यापूर्वी हा कालावधी २१ दिवसांचा होता, मात्र आता त्यात वाढ करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. भारतात गॅसचा साठा मर्यादित असल्याने सरकारने व्यावसायिक वापरापेक्षा घरगुती वापराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमधील अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा मोठा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत असला तरी, सर्वसामान्यांच्या घरातील शेगडी पेटती राहावी, यासाठी सरकारने घरगुती पुरवठा सुरक्षित ठेवण्यावर भर दिला आहे.
'पॅनिक बुकिंग' आणि साठेबाजी रोखणे हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे. आकडेवारीनुसार, जे ग्राहक पूर्वी सरासरी ५५ दिवसांनी सिलिंडर बुक करायचे, त्यांनी अचानक १५-१५ दिवसांच्या अंतराने बुकिंग सुरू केले होते. वापराच्या या विचित्र बदलामुळे बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. ही साखळी तोडण्यासाठी सरकारने २५ दिवसांचा नियम सक्तीचा केला आहे. यामुळे गरजेपेक्षा जास्त साठा करून ठेवणाऱ्यांना लगाम बसणार असून खऱ्या गरजू ग्राहकांना वेळेत सिलिंडर उपलब्ध होऊ शकणार आहे.
सामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, सरकारने सध्या गॅस, पेट्रोल किंवा डिझेलच्या किमती वाढवण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कच्च्या तेलाच्या किमती १३० डॉलर प्रति बॅरलच्या पार जात नाहीत, तोपर्यंत दरवाढ होणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. इंधन संकट टाळण्यासाठी सरकारने रिफायनरींना उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले असून तेल कंपन्यांना घरगुती कनेक्शनला सर्वोच्च प्राधान्य देण्यास सांगितले आहे. यामुळे जागतिक संकट असले तरी देशांतर्गत पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.