ट्रम्पना डिवचले : अमेरिका-इस्रायलची डोकेदुखी वाढणार

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी सोमवारी इराणचे नवे सर्वोच्च नेते (Iran new supreme leader) मोजतबा खामनेई (Mojtaba Khamenei) यांना उघड पाठिंबा जाहीर केला. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या पुत्र मोजतबा खामनेई यांची सर्वोच्च नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र अमेरिका आणि इस्रायलने या निवडीवर आक्षेप घेतला आहे. अशा परिस्थितीत रशियाने मोजतबा खामनेई यांना दिलेला पाठिंबा अमेरिका आणि इस्रायलसाठी नवी डोकेदुखी ठरू शकतो. दरम्यान, इस्रायलने इराणच्या कोणत्याही सर्वोच्च नेत्याला जिवंत सोडणार नसल्याची धमकीही दिली आहे.
नव्या सर्वोच्च नेत्याला शुभेच्छा देताना पुतीन यांनी विशेष संदेश जारी केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रशिया हा इराणचा विश्वासू मित्र राहिला आहे आणि पुढेही राहील. इराण सध्या सशस्त्र हल्ल्यांचा सामना करत असताना सर्वोच्च नेते म्हणून कार्य करताना धैर्य आणि चिकाटीची मोठी गरज भासेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुतीन यांनी इराणला पाठिंबा दर्शविला असला, तरी मोजतबा खामनेई यांच्या नियुक्तीला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी विरोध दर्शविला आहे. ट्रम्प म्हणाले की, खामनेई यांचा मुलगा सर्वोच्च नेते म्हणून स्वीकारार्ह नाही. इराणमध्ये शांतता आणि सौहार्द प्रस्थापित करणारा नेता आवश्यक आहे. जर त्यांच्या नियुक्तीला मान्यता मिळाली नाही, तर ते दीर्घकाळ टिकू शकणार नाहीत.
इराणचा बदला घेण्याचा इशारा
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात अयातुल्ला खामनेई, त्यांची पत्नी तसेच अनेक मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर इराण अधिक आक्रमक झाला असून इस्रायल आणि अमेरिकेच्या तळांवर प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यात आले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. खामनेई यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा इशारा इराणचे सुरक्षा प्रमुख अली लारीजानी (Ali Larijani) यांनी दिला आहे. त्यांनी ट्रम्प यांनाही इशारा देत तेहरान त्यांना एकटे सोडणार नाही, असे म्हटले. सर्वोच्च नेत्यांच्या हत्येची किंमत त्यांना चुकवावी लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोजतबा खामनेई यांच्याविषयी...
मोजतबा खामनेई हे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचे पुत्र आहेत. इराणच्या प्रभावशाली लष्करी संघटना आयआरजीसीशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. आतापर्यंत त्यांनी पडद्यामागून राजकीय कामकाज सांभाळले आहे. अलीकडील हल्ल्यात त्यांच्या आई-वडिलांसह त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. अयातुल्ला खामनेई यांच्या निधनानंतर आठ दिवसांनी, ८ मार्च रोजी मोजतबा खामनेई यांची सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली.