आमदार वेंझी व्हिएगस : मुख्यमंत्र्यांकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

पणजी : सासष्टी तालुक्यातील केळशी समुद्रकिनाऱ्यावर एका ब्रिटीश पर्यटकावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी मागणी बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी विधानसभेत केली.
सभागृहात शून्य प्रहरादरम्यान हा विषय मांडताना आमदार व्हिएगस म्हणाले, केवळ केळशीच नव्हे, तर साष्टीतील अनेक समुद्रकिनाऱ्यांवर भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, ते फिरणाऱ्या लोकांसाठी गंभीर धोका बनले आहेत. ब्रिटीश पर्यटकावरील हल्ला ही केवळ एकच घटना नसून, गेल्या महिन्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत. कुत्र्यांच्या चाव्यामुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणावर जखमी होत आहेत. दरम्यान, या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
विशेष मोहीम राबविण्याची मागणी
* केळशी ते मोबोर आणि सासष्टीतील इतर असुरक्षित किनाऱ्यांवर विशेष मोहीम राबवून सर्व भटक्या कुत्र्यांना पकडण्यात यावे
* पकडलेल्या कुत्र्यांना नोंदणीकृत प्राणी निवारा केंद्रात हलवण्यात यावे.
* पशुसंवर्धन मंत्री, पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री यांनी एकत्रितपणे प्रयत्न करून या समस्येचा कायमचा निपटारा करावा. 
या घटनांमुळे लोकांचा जीव धोक्यात आला असून, सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून गोव्याची जी ओळख आहे, ती पुसली जाऊ शकते. जर पर्यटक सुरक्षित नसतील, तर त्याचा थेट परिणाम राज्याच्या पर्यटनावर होईल. - वेंझी व्हिएगस, आमदार, बाणावली