मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून समोर आली माहिती.

पणजी: मागील पाच वर्षांत ८,४२५ गोमंतकीयांनी भारतीय पासपोर्ट सरेंडर करून भारताचे नागरिकत्व सोडले आहे. याचाच अर्थ महिन्याला सरासरी १४०, तर दिवसाला सरासरी ४ हून अधिक गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, वेंझी व्हिएगस आणि क्रुझ सिल्वा यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने परराष्ट्र मंत्रालयाच्या एफआरआरओकडून (FRRO) याविषयी माहिती मागवली होती. यानुसार, वर्ष २०२१ मध्ये ९५४ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते. त्यानंतरच्या पुढील तीन वर्षांत पासपोर्ट सरेंडर करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. २०२२ मध्ये १,२८५, तर २०२३ मध्ये २,०९४ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले. २०२४ मध्ये पाच वर्षांतील सर्वाधिक म्हणजेच २,२९५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले, तर २०२५ मध्ये ही संख्या कमी होऊन १,७९७ झाली.
भारतीय नागरिकत्व सोडलेल्या एकूण ८,४२५ जणांपैकी सर्वाधिक ८,३७० जणांनी पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारले आहे. त्यानंतर १८ जणांनी युके, १२ जणांनी कॅनडा, ९ जणांनी यूएस, ४ जणांनी जर्मनी, ३ जणांनी रशिया, तर २ जणांनी थायलंड या देशांचे नागरिकत्व स्वीकारले. तसेच प्रत्येकी एका व्यक्तीने कझाकस्तान, मेक्सिको, फ्रान्स, रोमानिया, टांझानिया आणि पोलंड या देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे. याबाबत महिला आणि पुरुष अशी स्वतंत्र आकडेवारी उपलब्ध नसल्याचे उत्तरात म्हटले आहे.
दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नाही
नागरिकत्व हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारणे हा व्यक्तीच्या वैयक्तिक निवडीचा भाग आहे. भारतीय संविधानाच्या कलम ९ नुसार, भारतात दुहेरी नागरिकत्वाला परवानगी नसल्याचेही उत्तरात नमूद करण्यात आले आहे.