सांकवाळ ग्रामसभेत 'कलम ३९ ए' आणि मेगा प्रकल्पांवरून रणकंदन

जमीन रूपांतरणास ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
08th March, 05:07 pm
सांकवाळ ग्रामसभेत 'कलम ३९ ए' आणि मेगा प्रकल्पांवरून रणकंदन

सांकवाळ: नगरनियोजन कायद्याचे (TCP) वादग्रस्त 'कलम ३९ ए' रद्द करण्याची मागणी संपूर्ण राज्यात जोर धरत असतानाच, रविवारी झालेल्या सांकवाळ ग्रामसभेतही या मुद्द्यावरून जोरदार पडसाद उमटले. सांकवाळ पंचायत क्षेत्रात कलम ३९ ए अंतर्गत कोणत्याही जमिनीचे रूपांतरण करण्यास परवानगी देऊ नये आणि अशा प्रस्तावांना पंचायतीने अधिकृतपणे विरोध करावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली. या विषयावरून ग्रामसभेतील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले.

सांकवाळची ही विशेष ग्रामसभा एमईएस (MES) महाविद्यालय सभागृहात पार पडली. यावेळी जुवारी ॲग्रो केमिकल्स कंपनीची जमीन, प्रस्तावित मेगा प्रकल्प आणि कलम ३९ ए या विषयांवरून नागरिकांनी पंचायत प्रशासनाला धारेवर धरले. गावात सध्या रस्त्यांचे जाळे अरुंद असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. अशा परिस्थितीत पायाभूत सुविधांचा अभाव असताना पंचायतीने मोठ्या बांधकाम प्रकल्पांना किंवा मेगा प्रकल्पांना मान्यता देऊ नये, असा सूर ग्रामस्थांनी लावला. कोणतेही नवीन प्रकल्प मंजूर करण्यापूर्वी पंचायतीने गावाची 'कॅरिंग कपॅसिटी' म्हणजेच सोसण्याची क्षमता तपासून पाहावी आणि त्याचा सविस्तर अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी ग्रामस्थांनी बंद पडलेल्या जुवारी ॲग्रो केमिकल्स किंवा पॅरादीप फॉस्फेट या कंपन्यांकडून थकीत असलेल्या शुल्काची वसुली करण्याकडेही लक्ष वेधले. पंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत मजबूत करण्यासाठी ही थकबाकी तातडीने वसूल करण्यात यावी, असे नागरिकांनी सुचवले. कलम ३९ ए मुळे गावचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत, ग्रामसभेने या तरतुदीविरोधात ठाम भूमिका घेण्याचे आवाहन केले. पंचायतीने लोकांच्या भावना लक्षात घेऊन या प्रकरणावर कडक पाऊल उचलण्याचे आश्वासन दिले आहे.

हेही वाचा