करमळी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी 'एक्झिक्युटिव्ह लाउंज'; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 03:23 pm
करमळी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी 'एक्झिक्युटिव्ह लाउंज'; अत्याधुनिक सुविधांचे लोकार्पण

मडगाव: कोकण रेल्वेने प्रवासी सुविधांमध्ये मोलाची भर घालत रविवारी करमळी रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक 'एक्झिक्युटिव्ह लाउंज'चे लोकार्पण केले. या नवीन सुविधेमुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर आणि आरामदायी होणार असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले.

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते या एक्झिक्युटिव्ह लाउंजचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई, कोकण रेल्वेचे संचालक सुनील गुप्ता यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करमळी स्थानकावरील या नवीन लाउंजमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये वातानुकूलित बैठक व्यवस्था, हायस्पीड वाय-फाय कनेक्टिव्हिटी, आरामदायी सोफे आणि रिक्लायनर सीट्स, स्वच्छ व अद्ययावत प्रसाधनगृहे, कॅफे सेवा व अल्पोपहार, डिजिटल रेल्वे वेळापत्रक डिस्प्ले आणि स्नान करून फ्रेश होण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या नवीन लाउंजसह कोकण रेल्वे मार्गावरील 'एक्झिक्युटिव्ह लाउंज'ची सुविधा असणारे करमळी हे आठवे स्थानक ठरले आहे. प्रवाशांना गाडीची प्रतीक्षा करताना उत्तम दर्जाची सेवा मिळावी, या उद्देशाने रेल्वेने हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे.


हेही वाचा