लोड न वाढवता जादा वीज वापरल्याने बसला दंडाचा भुर्दंड

वाढीव वीज बिलांबाबत वीज मंत्र्याचे स्पष्टीकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th March, 11:58 pm
लोड न वाढवता जादा वीज वापरल्याने बसला दंडाचा भुर्दंड

पणजी : काही भागांत व्यावसायिकांना आलेल्या अचानक वाढीव वीजबिलांबाबत विधानसभेत चर्चा झाली. मीटरवरील निश्चित लोड न वाढवता त्यापेक्षा जास्त वीज वापरल्यामुळे ग्राहकांवर दंड आकारण्यात आला आणि त्यामुळे वीजबिलाची रक्कम वाढल्याचे स्पष्टीकरण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले. ही समस्या लवकरच सोडवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सदर प्रश्न आमदार नीलेश काब्राल यांनी विधानसभेतील शून्य प्रहरात उपस्थित केला. कुडचडे आणि सावर्डे भागातील अनेक व्यावसायिक, किरकोळ दुकानदार आणि छोटे उद्योजक वाढीव वीजबिलांबाबत तक्रार घेऊन भेटत असल्याचे त्यांनी सांगितले.
अचानक वाढलेली बिलांची रक्कम
काही व्यापाऱ्यांचे पूर्वी दरमहा सुमारे ३ हजार ते ३,५०० रुपये इतके वीजबिल येत होते. मात्र, वीज वापरात कोणताही मोठा बदल नसतानाही अलीकडे १० हजार ते १७ हजार रुपये इतकी बिलांची रक्कम आल्याने व्यापारी अडचणीत सापडल्याचे आमदार काब्राल यांनी सांगितले. याशिवाय मीटर रीडिंग, लोड शुल्क आणि बिलातील इतर घटकांबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून सरकारने या वाढीव बिलामागील कारण स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

अनेक ग्राहकांनी ३ केव्हीए लोड मंजूर असताना ८ ते १० केव्हीएपर्यंत वीज वापरली, त्यामुळे नियमांनुसार त्यांना दंड आकारण्यात आला. या संदर्भात वीज खाते काम करत असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढला जाईल. - सुदिन ढवळीकर, वीजमंत्री 

हेही वाचा