ब्रह्मेशानंद स्वामी : डिचोलीत कन्नड बांधवांतर्फे भव्य कुंभमेळावा

कर्मभूमी कन्नड संघ, डिचोलीतर्फे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विशेष सन्मान करताना चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी. सोबत हनुमंताप्पा रेड्डी शिरूर, भगवान हरमलकर व इतर.
डिचोली : मातृभाषा हीच श्रेष्ठ असते, मात्र सध्या अनेकजण परकीय इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व देत आहेत. गोव्यात राहणाऱ्या कन्नड बांधवांनी आपली मूळ संस्कृती जपतानाच गोव्याची संस्कृतीही समजून घ्यावी, असे आवाहन ब्रह्मेशानंद स्वामी यांनी डिचोली येथे केले. कर्मभूमी कन्नड संघ आयोजित तपपूर्ती कन्नड सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर माजी सभापती राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, संघाचे अध्यक्ष हनुमंतप्पा रेड्डी, भारतेश गुळणवार आणि कर्नाटकातील अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. हुक्केरी मठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या दिव्य उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी महास्वामींनी सर्वांना संघटित राहून परस्परांना मदत करण्याचा संदेश दिला.
सकाळी झालेल्या कुंभमेळाव्यास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उपस्थिती लावून सहभागी १ हजार महिलांचे कौतुक केले. कन्नड बांधवांनी आपल्या संस्कृतीचे संवर्धन करावे, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या. कन्नड बांधवांचे संघटन मजबूत असून, ते संस्कृती रक्षणाचे उत्तम कार्य करत असल्याचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी यावेळी नमूद केले. हा समाज गोव्यात विविध क्षेत्रांत कार्यरत असून सामाजिक जिव्हाळा आणि बंधुभाव जपत असल्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष हनुमंताप्पा रेड्डी शिरूर यांनी स्वागतपर भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. या महोत्सवासाठी कन्नड बांधवांनी मोठी गर्दी केली होती, तसेच विविध पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
महोत्सवात कन्नड संस्कृतीचे दर्शन
कर्नाटक जागृती वेदिके आणि सांस्कृतिक खात्याच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात कन्नड संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्नाटकातील व्यक्तींचा यावेळी आमदार प्रेमेंद्र शेट व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.