४० उमदेवार उच्चशिक्षित, ३५ उमेदवार व्यावसायिक

पणजी महापालिका निवडणूक : एक उमेदवार बेरोजगार


2 hours ago
४० उमदेवार उच्चशिक्षित, ३५ उमेदवार व्यावसायिक

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महापालिका निवडणुकीसाठी बुधवार, ११ मार्च रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांचे शिक्षण आणि व्यवसाय संदर्भात माहिती घेतली असता, ६९ पैकी ५७.९७ टक्के (४०) उमदेवार उच्च शिक्षित आहेत, तर ५०.७२ टक्के (३५) उमेदवार व्यावसायिक आहेत. एक उमेदवार बेरोजगार आहे. याशिवाय ज्येष्ठ उमेदवाराचे वय ७३ वर्षे, तर तरुण उमेदवाराचे वय २४ वर्षे आहे.
उमेदवारांना प्रतिज्ञापत्राद्वारे शिक्षण, गुन्हे, व्यवसाय, मालमत्ता तसेच इतर माहिती देणे बंधनकारक असते. उमेदवारांनी प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, एका उमेदवाराने यूकेतून उच्च शिक्षण घेतल्याचे दिसून येते. इतरांनी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक येथून शिक्षण घेतले आहे. उमेदवारांनी दहावी, बारावी, तसेच नियमित कला, व्यावसायिक, विज्ञान, वाणिज्य, कायदा शाखेची पदवी, विविध विषयांवर डाॅक्टरेट, चार्टर्ड अकाऊंटंट तसेच कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स ऑफ टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर ऑफ सायन्स तसेच इतर विषयांत अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील युतिका जांबावलीकर आणि प्रभाग ३ मधील जाॅन पो सर्वांत तरुण उमेदवार आहेत. त्यांचे वय २४ वर्षे आहे. सर्वांत वयस्कर उमेदवार प्रभाग ९ मधील सुरेंद्र फुर्तादो आहेत. याशिवाय १२ उमेदवार ज्येष्ठ नागरिक आहेत. निवडणूक रिंगणातील ५७.९७ टक्के (४०) उमेदवार उच्च शिक्षित आहेत. ४ जणांनी नववीहून कमी शिक्षण घेतले आहे. २४ उमेदवारांनी दहावी ते बारावी तसेच आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. २८ उमेदवारांनी कला, विज्ञान, वाणिज्य, कायदा, वैद्यकीय तसेच विविध विषयांवर पदवी घेतली आहे. १२ उमेदवारांनी अभियांत्रिकी, तसेच इतर नियमित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
‍निवडणूक रिंगणातील एक उमेदवार बेरोजगार असून ३५ जण व्यावसायिक आहेत. पाच उमेदवार खासगी नोकरी करतात. दोघे विद्यार्थी आहेत. आठ उमेदवार वकील असून दोघे सल्लागार, तर दोघे शिक्षक, एक डाॅक्टर, आठ गृहिणी, दोन खलाशी, तर तिघे निवृत्त कर्मचारी आहेत.


महापालिकेसाठी उद्या मतदान
पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी ११ मार्च रोजी मतदान होणार आहे. १३ मार्च रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. भाजप समर्थित बाबूश मॉन्सेरात यांचे विकास पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार’ पॅनलमध्ये थेट लढत अपेक्षित आहे. एकूण ६९ उमेदवार रिंगणात आहेत. पणजी महापालिका क्षेत्रातील मतदार नोकरदारांना सरकारने मतदानाच्या दिवशी, बुधवार, ११ रोजी भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

हेही वाचा