३० प्रभागांसाठी ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात, ११ रोजी मतदान

पणजी : पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचा जाहीर प्रचार सोमवारी संपत आहे. ३० प्रभागांसाठी एकूण ६९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून मतदान ११ मार्च रोजी होणार आहे. या निवडणुकीत यंदा मुख्य लढत भाजपचे आमदार बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल यांच्यात होणार आहे. २३ प्रभागांत दुहेरी, तर ६ प्रभागांत तिरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक पाच उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उत्पल पर्रीकर यांनी ‘कमिटमेंट्स २०२६’ हा जाहीरनामा प्रसिद्ध करत पार्किंग समस्येचे निराकरण, स्वच्छता, वाहतूक व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणावर भर देण्याचे आश्वासन दिले. प्रचार संपल्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत ९ मार्च सकाळी ८ ते ११ मार्च संध्या. ६ वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. या काळात चारपेक्षा अधिक लोकांच्या जमावास, लाऊडस्पीकर वापरास व प्रचार वाहनांना बंदी राहणार आहे. दरम्यान निवडणूक अधिकाऱ्यांच्या वाहनांना परवानगी असेल. खासगी वाहनांची देखील तपासणी केली जाईल, अशी घोषणा उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.