भाजपचा पाठिंबा मिळालेल्या वेर्लेकर यांचा पराभव

मडगाव : आके-बायशचे (Aquem-Baixo) सरपंच (Sarpanch) फ्लोरियानो फर्नांडिस जिल्हा पंचायत (Zilla Panchayat) सदस्य झाल्यानंतर प्रभाग क्रमांक सहामधील जागा रिक्त झाली. त्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत (Byelection) आंतानिओ वाझ विजयी झाले तर भाजपकडून पाठिंबा देण्यात आलेले प्रदीप वेर्लेकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आके-बायशच्या प्रभाग क्रमांक सहासाठी रविवारी पोटनिवडणूक झाली. आके-बायशचे सरपंच राहिलेल्या फ्लोरियानो फर्नांडिस यांनी जिल्हा पंचायतीची निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढवत भाजपच्या उमेदवाराला हरवून निवडणूक जिंकली. त्यांच्या पंचायतीतील रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक झाली.
प्रभाग क्रमांक सहामध्ये एकूण ६०५ एवढे मतदार आहेत. त्यातील ९८ पुरुष व १०२ महिला अशा एकूण २०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण ३३ टक्के मतदान झाले. या पोटनिवडणुकीत आंतानिओ वाझ यांना जिल्हा पंचायत सदस्य फ्लोरियानो फर्नांडिस यांच्यासह सिध्देश भगत व इतरांनी पाठिंबा दर्शवला होता. तर प्रदीप वेर्लेकर हे त्यांच्या विरोधात उभे होते व त्यांना भाजपकडून पाठिंबा दर्शवण्यात आला होता. आमदार उल्हास तुयेकर यांनी सक्रीय पाठिंबा दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत रंगत आलेली होती.
या निवडणुकीत सासष्टीचे मामलेदार गौरव गावकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. मतमोजणीनंतर प्रदीप वेर्लेकर यांना ६५ तर आंतानिओ वाझ यांना १३२ मते मिळाली तर तीन मते अवैध ठरली. त्यामुळे आंतानिओ वाझ हे ६७ मताधिक्क्यांनी जिंकले. यानंतर जिल्हा पंचायत सदस्य फ्लोरियानो फर्नांडिस व सिध्देश भगत यांनी आनंद व्यक्त केला.