
मडगाव: आके बायशचे सरपंच फ्लोरियानो फर्नांडिस जिल्हा पंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सहाच्या जागेसाठी रविवारी शांततेत मतदान पार पडले. या पोटनिवडणुकीत आंतानियो वाझ आणि प्रदीप वेर्लेकर यांच्यात थेट लढत होत असून, राजकीय पक्षांच्या सक्रिय सहभागामुळे या स्थानिक निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
फ्लोरियानो फर्नांडिस यांनी काँग्रेसच्या तिकिटावर जिल्हा पंचायतीची निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या पंच सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी घाटमरड येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील केंद्रावर मतदान घेण्यात आले. सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली, मात्र मतदारांचा प्रतिसाद संमिश्र होता. मागील निवडणुकीत या प्रभागातून सुमारे २५० मतदान झाले होते, यावेळीही साधारण २०० च्या आसपास मतदान होईल, असा अंदाज उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
ही निवडणूक तांत्रिकदृष्ट्या पक्षाच्या चिन्हावर होत नसली, तरी भाजप आणि काँग्रेसच्या गोटात मोठी चुरस पाहायला मिळाली. प्रदीप वेर्लेकर यांना स्थानिक भाजप आमदार उल्हास तुयेकर आणि भाजप कार्यकर्त्यांनी उघड पाठिंबा दर्शवला आहे. दुसरीकडे, आंतानियो वाझ यांना जिल्हा पंचायत सदस्य फ्लोरियानो फर्नांडिस आणि सिद्धेश भगत यांनी समर्थन दिले आहे. आमदार स्वतः निवडणूक केंद्रावर उपस्थित राहिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
प्रदीप वेर्लेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की, मागील वेळी केवळ चार मतांनी हुकलेला विजय यावेळी भाजपच्या समर्थनामुळे नक्कीच साध्य होईल. तर, प्रथमच निवडणूक लढवत असलेले आंतानियो वाझ यांनी मतदारांच्या आशीर्वादाने आपण नक्कीच निवडून येऊ, असा आशावाद व्यक्त केला. सिद्धेश भगत यांनीही आमदार मैदानात उतरल्याने ही लढत अटीतटीची झाली असली, तरी जनहिताच्या कामांमुळे आमचाच उमेदवार विजयी होईल, असे नमूद केले.