नियमांचे पालन करत सुरक्षित उत्सव साजरा करण्याचे आवाहन

मडगाव : गोव्यातील (Goa) जांबावली येथे १० मार्च रोजी होणार्या गुलालोत्सवासाठीच्या सुरक्षेसंबंधी दक्षिण गोवा पोलीस (South Goa Police) प्रशासनाकडून आढावा घेण्यात आला. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी जिल्ह्यातील २५० पोलीस तर वाहतूक (Traffic) पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी ३०५ वाहतूक पोलिस व आयआरबी तैनात असतील; अशी माहिती दिली.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक संतोष देसाई यांनी जांबावली (Zambaulim) देवस्थान समितीचे अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांच्यासह पत्रकार परिषद घेत बंदोबस्ताची माहिती दिली. देसाई यांनी सांगितले की, १० मार्च रोजी जांबावली येथील श्री दामोदर देवस्थानात गुलालोत्सव साजरा केला जातो. याठिकाणी हजारोच्या संख्येने भाविक येतात.
या उत्सवासाठी पाच सेक्टरमध्ये सुमारे २५० जिल्हा पोलीस विविध ठिकाणी तैनात केले जातील. मंदिराच्या ठिकाणी व महत्त्वाच्या ठिकाणी २मेटल डिटेक्टर’ लावण्यात येतील. याशिवाय चोरी व इतर अनुचित घटना घडू नयेत यासाठी ‘वॉच टॉवर’ उभारणी करण्यात आलेली आहे. गुलालाला येणार्या भाविकांनी पोलिसांना सहकार्य करावे व सुरक्षित उत्सव साजरा करावा असे आवाहन केले.
मंजुनाथ दुकळे यांनी सांगितले की, गुलालोत्सवासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवलेला आहे. याठिकाणी येणार्या भाविकांनी रस्त्यावर गाड्या लावू नयेत, पार्किंग जागेत गाडी लावावी. उत्सवासाठी गुलालच वापरावा, त्यासाठी मंदिरात गुलाल उपलब्ध असेल.
देवकार्य झाल्यानंतरच गुलाल लावण्याची सुरूवात करण्यात यावी. पालखी दर्शनासाठी आवश्यक वेळ दिला जाईल. तसेच पालखी मंदिरात घेताना गर्दी करू नये कारण त्यावेळी चेंगराचेंगरी होऊ शकते. पालखी मंदिरात घेतल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येईल. पाणवठ्यावर जाताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही दुकळे यांनी सांगितले.
२२५ वाहतूक पोलीस, ८० आयआरबी तैनात
दक्षिण गोवा वाहतूक पोलीस अधीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत वाहतुकीच्या मार्गातील बदल व पार्किंगबाबतची माहिती दिली. प्रभुदेसाई यांनी सांगितले की, गुलालोत्सवासाठी सहा पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक, सहा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यासह एकूण २२५ वाहतूक पोलीस तैनात असतील.
त्याशिवाय राखीव दलाचे ८० पोलीस तैनात केले जातील. यावेळी सहा ठिकाणी पार्किंगच्या जागा असून ३ हजार कार व साडेतीन हजार दुचाकी पार्किंगची सोय असेल. गाडी चालकांना पार्किंगसाठी पोलीस सहकार्य करतील. आपत्कालीन वेळी ‘ग्रीन कॉरिडॉर’ करून रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहनांना वाट करून दिली जाईल, असे प्रभुदेसाई यांनी सांगितले.