गोव्यातील ४० वर्षांवरील सर्व महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची 'चेक्ड बाय दोतोर' मोहिमेची घोषणा

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 04:11 pm
गोव्यातील ४० वर्षांवरील सर्व महिलांची होणार मोफत आरोग्य तपासणी

पणजी: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक घोषणा केली आहे. गोव्यातील ४० वर्षांवरील सर्व महिलांसाठी 'चेक्ड बाय दोतोर' ही विशेष आरोग्य मोहीम राबवण्यात येणार असून, याअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये महिलांची संपूर्ण शरीर तपासणी (Full Body Checkup) मोफत केली जाणार आहे. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.



जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांदरम्यान मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिला नेहमीच कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतात, मात्र असे करताना त्यांचे स्वतःच्या प्रकृतीकडे वारंवार दुर्लक्ष होते. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC), सामुदायिक आरोग्य केंद्रे (CHC), जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे ४० वर्षांवरील महिलांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत.



या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ सरकारी रुग्णालयेच नव्हे, तर खासगी रुग्णालयांमध्येही सवलतीच्या दरात तपासणीची सोय करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली असून, तिथे महिलांना अल्प दरात या चाचण्या करून घेता येतील. साधारणपणे या चाचण्यांसाठी खासगी ठिकाणी ८ ते १० हजार रुपये खर्च येतो, परंतु या मोहिमेअंतर्गत महिलांना अत्यंत कमी शुल्कात ही सुविधा मिळणार आहे. मणिपालसारख्या नामांकित खासगी रुग्णालयांनीही या मोहिमेत सहभाग दर्शवला आहे.



सरम्यान, राज्यात रविवारी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पणजीसह विविध भागांत महिलांच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 'चेक्ड बाय दोतोर' या मोहिमेचा राज्यातील जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याप्रती जागरूक राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या उपक्रमामुळे राज्यातील महिलांच्या आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा