युद्धाचा भडका; कच्च्या तेलाच्या किंमती २०२२ नंतर प्रथमच १०० डॉलर्सवर


09th March, 01:52 pm
युद्धाचा भडका; कच्च्या तेलाच्या किंमती २०२२ नंतर प्रथमच १०० डॉलर्सवर

तेहरान : इस्त्रायल (Israel), अमेरिका (USA) आणि इराण (Iran) यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाचे (War)  परिणाम दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या किमतीवर त्याचा बराच परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किमती २०२२ नंतर प्रथमच प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. सोमवारी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. 

कच्च्या तेलाच्या आयातीवर अनेक देश विसंबून आहेत. वाढत्या किमतीमुळे त्यांच्या अडचणी वाढत आहेत. बांगलादेश, पाकिस्तान या देशांमधील परिस्थिती पू्र्वीच ‌बिकट आहे. जगभरात कच्च्या तेलाची कमतरता भासणार असल्याने; महागाई प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. आखाती युद्धाने जग संकटात सापडले आहे.

तेलाच्या किमती वाढल्याने संकटात अधिक भर पडली आहे. सोमवारी तेलाच्या किमतीत बरीच वाढ झाली. २५ टक्क्यांनी ब्रेंट क्रूडच्या क‌िमती वाढून ११५ डॉलर्स प्रति बॅरलच्या पुढे गेल्या. डब्ल्यूटीआय क्रूडच्या किमतीत २४ टक्क्यांनी वाढ झाली. प्रति बॅरल ११२ डॉलर्सवर व्यापार झाला. मुरबान या क्रूडच्या किमती १८ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल १२० डॉलर्सवर पोहोचल्या तर नैसर्ग‌िक वायूची किंमत ८ टक्क्यांनी वाढली. 

अमेरिकेत उत्पादित होत असलेल्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत गेल्या शुक्रवारी ९०.९० अमेरिकन डॉलर्सवर बंद झाली होती. आता १०६.२२ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल एवढी नोंदवली गेली. 

स्थिती अशीच राहिल्यास भारतावरही परिणाम 

कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत असताना भारताने (India) पुरेसा साठा असल्याचा दावा केला आहे. तरीही त्याचे प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाचा भारत हा एक प्रमुख दावेदार आहे. गरजेच्या तेलाच्या प्रमाणात सुमारे ८५ टक्के आयात करण्यात येते. कच्च्या तेलाच्या किमती अशा प्रकारे वेगाने वाढत राहिल्यास महागाईचे संकट अधिक गडद होणार.  आणि संघर्ष असाच सुरू राहिल्यास भारतालाही महागाईचा फटका बसणार आहे. 


हेही वाचा