मेणकुरे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ‘चर्चेची वार्ता’मध्ये वाचकांचा सूर

पणजी : डिचोलीतील मेणकुरे येथे होळी अंगावर पडून झालेल्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण गोवा हादरला आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या परंपरा आणि संस्कृती जपताना मानवी जीव आणि पर्यावरण यांचा विचार होणे किती गरजेचे आहे, यावर ‘दै. गोवन वार्ता’च्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘चर्चेची वार्ता’ या सदरात वाचकांनी सडेतोड मते मांडली आहेत.
.......
या दुर्दैवी घटनेत, एका भाविकाने आपली पारंपरिक सेवा बजावताना आपला अमूल्य जीव गमावला. मात्र, इतकी मोठी दुर्घटना घडूनही त्या भागातील होळीच्या उत्सवावर कोणताही परिणाम झाला नाही, तो परंपरेनुसार सुरूच राहिला. यातून हेच दिसून येते की, काहीही झाले तरी पारंपरिक कार्यक्रम हे थांबत नाहीत. जर कोणी अशा प्रथांमध्ये काही बदल सुचवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला समाजाकडून तीव्र विरोधाला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणीही सुधारणा सुचवण्याचे धाडस करत नाही... सर्वच जण हतबल आहेत. - श्रीकांत कवळेकर
........... 
अगदी बरोबर आहे. होळी २०-२५ फूट पुरेशी आहे. पण, परंपरा आणि संस्कृती जपलीच पाहिजे. - शाम धुरी
.............
झाडांची कत्तल करून होळी साजरी करण्यापेक्षा यावर दुसरा पर्याय शोधावा, कित्येक वर्षे वाढलेली भलीमोठी झाडे कापून शेवटी ती जाळूनच टाकायची असतील तर फक्त पुरणाची पोळी खाऊन व शेजाऱ्या-पाजाऱ्यांना वाटून साजरी करा, निसर्गाचा ऱ्हास करून एखादा सण देवासाठी म्हणून करणे ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. शबय-शबय म्हणत दारात भटकणारे काहीजण चक्क ‘हुर्राक’ ढोसून बळजबरीने पैसे वसुल करतात. तर काही ठिकाणी होळीच्या नावावर वाहने अडवून पैसे मागितले जातात, यावर अंकुश लावायला पोलीसही पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना त्या दिवसासाठी तसे न करण्याची तंबी दिली जाते. शेवटी इतकेच की हा निसर्गाचा ऱ्हास थांबायला हवा. - अविनाश म्हापणकर
..............
होळी हा आनंदाचा आणि श्रद्धेचा सण असला तरी मानवी जीवापेक्षा कोणतीही परंपरा मोठी नाही. अलीकडील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर गावागावांत होळीचा आकार मर्यादित ठेवून आवश्यक सुरक्षा उपाय करणे गरजेचे आहे. परंपरा जपत असताना सुरक्षिततेलाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. - राजेंद्र पेडणेकर
.....
गावाची उंच होळी घालण्याची ही परंपरा आहे. पण, काळ बदलत आहे. उंच होळी उभी करणारे, दणकट शरीरयष्टी असणारे आणि अंगमेहनत करणारे तरुण गावात आहेत का, याचाही विचार व्हायला हवा. परंपरा जपत असताना सुरक्षिततेची जाणीव ठेवणे आणि काळानुसार बदल स्वीकारणेही तितकेच आवश्यक आहे. - प्रवीण कोटकर
..... 
होळी हा एक प्रमुख सण असून तो प्रत्येकाने साजरा केला पाहिजे. पण माणसाच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या परंपरा, सण हे माणसांसाठीच आहेत आणि आपण सगळ्या गोष्टीचे भान ठेवून आनंदने आणि श्रद्धेने मनवले पाहिजे. बदलत्या काळाबरोबर चालताना पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल अशी लहान आकाराची होळी उभारून सण साजरा करावा. - शांबा नाईक
...... 
प्रत्येककाने आपला जीव सांभाळून काम केले पाहिजे. निष्काळजीपणाने काम केले तर त्याचे दुष्परिणाम होतात. - कृष्णा नाईक
......
झाडे कापण्यावर बंदी आणा. - गुरुदास केरीकर
.......
आता काळ बदललाय, माणसांनीसुद्धा काळाप्रमाणे बदलायला पाहिजेत. जुन्या अंधश्रद्धा सोडून दिल्या पाहिजेत. - दामू गावडे