मोरजी येथे ‘चोरीचे रोमट’ उत्साहात

केळीचे घड, आंबे, फणस, मक्याची कणसे चाेरण्याची परंपरा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
मोरजी येथे ‘चोरीचे रोमट’ उत्साहात

मोरजी येथील श्री मोरजाई मंदिर परिसरात रोमट नाचताना युवक. (निवृत्ती शिरोडकर)

पेडणे : मोरजी गावात शिगमोत्सवाच्या आठव्या रात्री पारंपरिक ‘चोरीचे रोमट’ मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. या अनोख्या परंपरेत केळीचे घड, आंबे, फणस, मक्याची कणसे यांसारख्या वस्तू प्रतीकात्मकरीत्या ‘चोरी’ करून नाचत-गाजत देवळात आणून ठेवण्याची प्रथा आहे.
मोरजी येथे दरवर्षी शिगमोत्सवाची सुरुवात होळीच्या दिवसापासून केली जाते. सकाळी हरिजनवाड्यावर उत्सवाची नौबत वाजवून कार्यक्रमाची सुरुवात होते. त्यानंतर राष्ट्रोळी म्हारींगण देवाची होळी घातली जाते. ही होळी प्रामुख्याने सावरी किंवा आंब्याच्या झाडाची असते. विधीवत पूजनानंतर गाऱ्हाणे घातले जाते. यानंतर वाजत-गाजत मंडळी सत्पुरुषा देवाकडे जातात. तेथे देवशेट किंवा परब घराण्यातील व्यक्तीकडून गाऱ्हाणे घालून देवशेट व्यक्तीला पगडी बांधली जाते. त्यानंतर गावाची होळी आणून ग्रामदेवता श्री मोरजाई देवी मंदिरासमोरील पारंपरिक ठिकाणी मानकऱ्यांकडून उभी केली जाते.
त्याच दिवशी विविध प्रकारची माणे गाऊन ‘भलीगे रोमटा’ काढण्यात येतो. जाणकार रामनाथ पवार यांच्या हस्ते सामुदायिक गाऱ्हाणे घालून रोमटाची सुरुवात होते. पुढील सात दिवस हा रोमट संपूर्ण गावात घरोघरी फिरतो. प्रत्येक घरात गणेश पूजन केले जाते. रोमटासोबत शेकडो नागरिक सहभागी होऊन ‘शबय शबय’ असा जयघोष करतात.
सातव्या दिवशी रोमट गावभर फिरून झाल्यानंतर कान्नाईक वाडा पुरखे यांच्या घरी सर्व रोमटांचा मेळ जमतो. त्या ठिकाणी नवस फेडले जातात. त्यानंतर रोमट नाचत-गाजत श्री मोरजाई देवीच्या मंदिराकडे आणले जाते. वाटेत मिळणाऱ्या फणस, आंबे, केळीचे घड अशा वस्तू घेऊन त्या देवळाजवळ अर्पण केल्या जातात.
आठव्या रात्री पारंपरिक ‘चोरीचे रोमट’
आठव्या रात्री ‘माणो’ म्हणत वाजंत्रीच्या तालावर खास पद्धतीने ‘चोरीचे रोमट’ काढले जाते. या रोमटात लहान मुले किंवा जाणकार मंडळी सहभागी होत नाहीत. केळीचे घड, आंबे, फणस आणि मक्याची कणसे यांची प्रतीकात्मक चोरी करून त्या वस्तू देवळात आणून ठेवण्याची परंपरा आहे. यंदा देखील आठव्या रात्री हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाही या सोहळ्याला हजारो नागरिक उपस्थित राहिले होते.

हेही वाचा