ट्रम्प म्हणतात, इराणविरुद्धचे युद्ध जवळपास पूर्णपणे संपुष्टात!

तेल, वायूच्या किमतींमध्ये मोठी घसरण

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
10th March, 11:31 pm
ट्रम्प म्हणतात, इराणविरुद्धचे युद्ध जवळपास पूर्णपणे संपुष्टात!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (UD president Donald Trump) यांनी ‘इराणमधील युद्ध जवळपास पूर्णपणे संपले आहे’ असे विधान केल्यानंतर मंगळवारी तेल आणि वायूच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. दरम्यान, इराणकडून यावर कडवी प्रतिक्रिया आली असून युद्ध संपलेले नाही, ते आम्ही ठरवू, असा इशारा इराणने दिला आहे.

इराण-इस्रायल, अमेरिका या संघर्षामुळे मध्यपूर्वेकडील ऊर्जा पुरवठ्यात दीर्घकालीन व्यत्यय येईल या भीतीमुळे सोमवारी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२० डॉलरच्या जवळपास पोहोचले होते. मात्र ट्रम्प यांच्या विधानानंतर हे दर पुन्हा घसरून ९० डॉलरच्या खाली आले. युद्धापूर्वीच्या काळाच्या तुलनेत तेलाच्या किमती अजूनही लक्षणीयरीत्या जास्त असल्या, तरी जागतिक शेअर बाजारांमध्ये मात्र पुन्हा तेजी दिसून आली.

जगातील सर्वात मोठी तेल निर्यातदार कंपनी असलेल्या सौदी अरेबियाच्या ‘अरामको’च्या (Aramco) प्रमुखांनी इशारा दिला आहे की, जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला सागरी मार्ग ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Hormuz strait ) जर बंद राहिला, तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. जगातील एकूण तेलापैकी सुमारे पाचवा हिस्सा (२० टक्के) या अरुंद जलमार्गातूनच वाहून नेला जातो. परंतु आठवड्याभरापूर्वी युद्ध सुरू झाल्यापासून या मार्गावरील वाहतूक जवळजवळ पूर्णपणे ठप्प झाली आहे.

अरामकोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमीन नासेर यांनी असा इशारा दिला की, जागतिक स्तरावरील तेलाचा साठा गेल्या पाच वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. पुरवठ्यात निर्माण झालेल्या या अडथळ्यामुळे उपलब्ध साठा अधिक वेगाने वापरला जाण्याची शक्यता आहे. हा व्यत्यय जितका जास्त काळ सुरू राहील तितके जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम तितकेच अधिक गंभीर असतील, असे त्यांनी म्हटले आहे.

मंगळवारी आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेने (आयईए) ‘जी-७’ राष्ट्रांसोबत दुसरी बैठक आयोजित केली. या बैठकीत जागतिक तेल बाजार स्थिर करण्यासाठीच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली. विविध देशांकडे उपलब्ध असलेल्या साठ्यातून लाखो बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा बाजारात सोडण्याच्या पर्यायाचाही यात समावेश होता. आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यासाठी राखून ठेवलेला तेलाचा साठा बाजारात उपलब्ध करून द्यायचा की नाही, याविषयीचा पुढील निर्णय घेण्यासाठी आयईए लवकरच सदस्य राष्ट्रांच्या सरकारांची एक बैठक आयोजित करणार आहे.


डोनाल्ड ट्रम्पची दर्पोक्ती...
सोमवारी फ्लोरिडा येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, आम्ही एक छोटीशी लष्करी मोहीम हाती घेतली होती. कारण काही दुष्ट शक्तींचा नायनाट करण्यासाठी तसे करणे आम्हाला आवश्यक वाटले. आता तुम्हाला दिसून येईल की, ती एक अल्पकालीन मोहीम होती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, जर इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेलाचा प्रवाह थांबविण्याची कृतीय केली, तर अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत केलेल्या हल्ल्यांपेक्षा ‘वीस पट अधिक जोरदार’ हल्ला करेल.

इराणचा आक्रमक पवित्रा
इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (आयआरजीसी) म्हटले आहे की, ट्रम्प यांच्या या मूर्खपणाच्या विधानाला प्रत्युत्तर म्हणून इराणचे सशस्त्र दल या प्रदेशातून तेलाचा एकही लिटर निर्यात होऊ देणार नाहीत. काही देशांच्या जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाऊ शकते. परंतु त्यासाठी त्या देशांना प्रथम इस्रायल आणि अमेरिकेच्या राजदूतांना त्यांच्या देशातून हाकलून लावावे लागेल. या मार्गावरून जाणाऱ्या तेल टँकर आणि व्यापारी जहाजांवर, विशेषतः अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांच्या जहाजांवर सुरक्षा कर लादण्याची योजना इराण आखत आहे, असे वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिले आहे.

भारतात व्यावसायिक गॅसचे संकट
केंद्र सरकारने देशभरात ‘अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५’ लागू केला आहे. हेर्मुझ जलमार्गातून होणारा गॅस पुरवठा ठप्प झाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसह अनेक राज्यांनी व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर सध्या बंदी घातली आहे. या बंदीमुळे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स बंद होण्याची वेळ आली आहे. लहान हॉटेल्स आणि भोजनालये चालवणाऱ्यांनी सरकारला पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा