दुर्गंधीयुक्त काळे पाणी रस्त्यावर पसरल्याने नागरिक संतप्त

वाळपई : होंडा औद्योगिक वसाहतीमध्ये कार्यरत असलेल्या सुक्राफ्ट रिसायकलिंग (पेपर मिल) या प्रकल्पामधून सातत्याने होत असलेल्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांची डोकेदुखी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या प्रकल्पातून वारंवार येणारी तीव्र दुर्गंधी आणि अनेक वेळा रस्त्यावर वाहू लागणारे दूषित पाणी यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
मंगळवारी सकाळी या प्रकल्पातून दुर्गंधीयुक्त काळे पाणी रस्त्यावर पसरल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. कंपनीने तत्काळ याची दखल घेऊन रस्त्यावर पसरलेले पाणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले; मात्र जवळपास चार तास परिसरात घाण आणि दुर्गंधीचे वातावरण कायम होते. या घटनेमुळे या प्रकल्पाच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या संदर्भात आमदारांकडेही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. तरीदेखील या प्रकल्पातून होणाऱ्या प्रदूषणावर अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे आमदार तसेच गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळानेही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कंपनीला योग्य उपाययोजना करण्यास भाग पाडावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पसरल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाची धावपळ उडाली. व्यवस्थापनाने तात्काळ घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली व कामगारांकडून साफसफाईचे काम सुरू केले. सुमारे तीन तास साफसफाई करण्यात आली. पाण्याचा फवारा मारणे तसेच मातीचा थर टाकून रस्त्यावर साचलेली घाण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी येणार होते. या पाहणीची माहिती कंपनीच्या व्यवस्थापनाला मिळाल्यानंतर त्यांनी कंपनी परिसरात साफसफाईचे काम सुरू केले होते. अनेक ठिकाणी घाईघाईने साफसफाई केली जात होती. मात्र साफसफाई सुरू असतानाच प्रकल्पातील दुर्गंधीयुक्त पाणी अचानक रस्त्यावर पसरल्याने व्यवस्थापनाची दाणादाण उडाली.