कारागृहात महिलेकडून ड्रग्ज तस्करी प्रकरण

म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात एका महिलेकडून झालेल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणी पोलिसांनी फॉस्टन अॅलन रॉवलेस (४८, रा. वरचावाडा, हरमल, मूळ सावंतवाडी महाराष्ट्र) याला अटक केली. कैदी सुनील मडकईकर याच्यामार्फत एका विदेशी कैद्याला हशीश ऑईल हा ड्रग्ज पुरवण्याचा हा प्रयत्न झाला होता. सदर कैद्यालाही पोलीस अटक करणार आहेत.
शुक्रवार दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कारागृहात ड्रग्ज तस्करीचा प्रकार घडला होता. कारागृहाचे उपअधीक्षक दत्ता कुडचडकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार दिली. संशयित आरोपी तन्वी अक्षय पोळजी भोमकर (२३, रा. म्हापसा, मूळ रा. वांते सत्तरी) या महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. संशयित महिला अंडरट्राईल कैदी सुनील मडकईकर याला भेटण्यासाठी तुरुंगात गेली होती.
या भेटी दरम्यान तिने कैदी मडकईकरला हा ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कारागृह कर्मचाऱ्यांनी तिला रंगेहात पकडले होते व तिच्याकडून १० हजारांचा १० ग्रॅम हशीश ऑईल हा ड्रग्ज जप्त केला होता.
हरमल येथे वास्तव्यास असलेला संशयित फॉस्टन अॅलन रॉवलेस याने महिलेच्या मार्फत आपल्या एका विदेशी साथीदार कैद्याला हा ड्रग्ज पुरवण्याचा प्रयत्न केला होता. ड्रग्ज तस्करीसाठी संशयित फौस्टन आणि त्या विदेशी कैद्याने संशयित महिला आणि अंडरट्राईल कैदी सुनील मडकईकर यांचे सहाय्य घेतले होते. कारागृहात कैदी भेटीच्यावेळी हा ड्रग्ज तस्करीचा कट दोन्ही संशयितांनी रचला होता, असे पोलीस चौकशीतून उघडकीस आले आहे.
विदेशी कैद्याची ओळख पटली; अटकेची तयारी
पोलिसांनी सदर विदेशी कैद्याची ओळख पटवली असून त्यालाही या प्रकरणात अटक केली जाणार आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजीत कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र साटेलकर हे करीत आहेत.