
मडगाव : वास्को येथे २०१९ मध्ये कौशलेंद्र प्रताप सिंग (३३) या नौदल जवानाचा कौटुंबिक वादातून खून झाला होता. याप्रकरणी पत्नी संध्या चौहान हिला दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याव्यतिरिक्त ५० हजारांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
वास्को पोलिसांनी पतीच्या खूनप्रकरणी पत्नी संध्या चौहान हिला अटक केली होती. ३ जून ३०१९ रोजी झालेल्या भांडणावेळी संध्याने रागाच्या भरात कौशलेंद्र याच्या डोक्यात लाकडी वस्तूने प्रहार केला, ज्यात गंभीर जखमी झालेल्या कौशलेंद्र याचा मृत्यू झाला. कौशलेंद्र हा दारूच्या नशेत वारंवार संध्या हिचा छळ करायचा आणि मारहाण करायचा, याच्यामुळेच पतीपत्नीत सतत भांडणे व्हायची असे पोलीस तपासात समोर आले. या खूनप्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश राम प्रभु देसाई यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने पतीच्या खूनप्रकरणी संध्या चौहान हिला दोषी ठरवले होते. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय ५० हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांचा सश्रम कारावास सुनावण्यात आला आहे.