तेहरानमधील तेल साठ्यांवर इस्रायलचा हवाई प्रहार

तेहरान : इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांची तीव्रता वाढत चालली आहे. (Iran-Israel war) इस्रायलने तेहरानमधील तेल साठ्यांवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर इराणसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. या हल्ल्यानंतर झालेल्या स्फोटांमुळे प्रचंड धूर हवेत पसरला असून संपूर्ण परिसरावर विषारी धुराची चादर पसरल्याचे चित्र दिसत आहे. आम्ल पावसाची (Acid rain) शक्यता व्यक्त करण्यात येत असून स्थानिक नागरिकांनी त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. काही ठिकाणी काळ्या रंगाचा शिडकावा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. शनिवारी रात्री इस्रायलने तेहरान आणि अल्बोर्ज परिसरातील अनेक तेल साठ्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे.
तेलसाठ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर मोठे स्फोट झाले आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा उसळल्या. त्यातून निघणारा दाट धूर मोठ्या प्रमाणावर हवेत पसरला आहे. राजधानी तेहरानमध्ये सध्या दाट धुक्यासारखा विषारी धूर पसरल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शनिवारी रात्री निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे तेहरानमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांत पाऊस पडला, मात्र हा पाऊस काळ्या पाण्याचा होता, असे स्थानिकांनी सांगितले. हा आम्लयुक्त पाऊस मानवी आरोग्यास अपायकारक असतो.
नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला
इराणमधील पर्यावरणविषयक संस्थांनी नागरिकांना शक्यतो घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. हवेत पसरलेल्या विषारी धुरामुळे त्वचा व फुफ्फुसांच्या आजारांचा धोका वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. पावसाची शक्यता असल्यास बाहेर न पडण्याचा इशारा प्रशासनाने दिला असून नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्याच्या तक्रारी वाढल्या
हवेत धूर मिसळल्यामुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. वातावरणात हायड्रोकार्बन आणि धुराचे प्रमाण वाढल्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवत आहेत. काही ठिकाणी आम्ल पावसामुळे वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.