बँकत दमडी नाही, पण आयकर विभागाची पाठवली ७ कोटींची नोटीस

युपीचा गरीब मजूर बनला 'कागदोपत्री' करोडपती! सहा वर्षांपूर्वीची 'ती' एक चूक पडली महागात.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 04:38 pm
बँकत दमडी नाही, पण आयकर विभागाची पाठवली ७ कोटींची नोटीस

 हरदोई: नशिबाचे दशावतार काय असतात, याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील हरदोई येथील एका गरीब मजुराला आला आहे. ज्या कुटुंबाकडे उद्याची चूल पेटवण्यासाठी पुरेसे धान्य नाही, त्या कुटुंबाच्या दारावर जेव्हा आयकर विभाग सात कोटी रुपयांच्या कर थकबाकीची नोटीस घेऊन उभा राहिला, तेव्हा सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. हरदोईच्या माधोगंज पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या रुदामौ गावातील गोविंद नावाचा हा मजूर सध्या सरकारी कागदपत्रांवर 'करोडपती' ठरला असला, तरी प्रत्यक्षात तो न्यायासाठी आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडत आहे.

एका बाजूला गरिबीशी संघर्ष आणि दुसरीकडे तब्बल ७ कोटी १५ लाख ९२ हजार ७८६ रुपयांच्या कर थकबाकीचा डोंगर, अशा दुहेरी संकटात गोविंदचे कुटुंब सापडले आहे. आयकर विभागाचे पथकाने जेव्हा त्याच्या घरी जाऊन ही नोटीस बजावली, तेव्हा संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. ज्या माणसाला आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी दिवसभर घाम गाळावा लागतो, तो इतक्या मोठ्या रकमेचा व्यवहार कसा करू शकतो, असा प्रश्न उपस्थित झाला. या धक्कादायक प्रकारानंतर गोविंदने आपल्या फसवणुकीची व्यथा मांडली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची मुळे सहा वर्षांपूर्वीच्या एका घटनेत दडलेली आहेत. उदरनिर्वाहासाठी कानपूरला गेलेल्या गोविंदला त्याच्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा घेत काही भामट्यांनी सरकारी मदतीचे आमिष दाखवले होते. एका महिलेने त्याला सीतापूरमधील बिस्वान येथे नेऊन एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यास भाग पाडले. केवळ दोन-तीन हजार रुपयांच्या मदतीसाठी गोविंदने बँकेच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या, मात्र त्याचे पासबुक आणि चेकबुक संबंधित टोळीने स्वतःकडेच ठेवून घेतले. आज तीच चूक त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी आपत्ती ठरली आहे.

तपासानुसार, फसवणूक करणाऱ्या या टोळीने गोविंदच्या नावावर असलेल्या बँक खात्याचा वापर करून एक बनावट 'फर्म' तयार केली आणि त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार केले. आयकर विभागाच्या नोटिशीमुळे आता हे स्पष्ट झाले आहे की, ज्या रकमेचा गोविंदने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता, त्या रकमेचा कर भरण्याची जबाबदारी आता त्याच्यावर टाकली गेली आहे. गोविंदचे कुटुंब अत्यंत साध्या परिस्थितीत राहते; त्याचा मोठा भाऊ छोटे दुकान चालवतो, तर धाकटा भाऊ मजुरी करतो. सध्या गोविंदने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून, आपले निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी तो धडपडत आहे. या घटनेने बँकिंग सुरक्षा आणि 'केवायसी' प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.


हेही वाचा