जिद्द आणि बहिणीची साथ: भीषण अपघात आणि स्मृतिभ्रंशावर मात करत आथिराची यूपीएससीत गरुडझेप!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th March, 11:33 am
जिद्द आणि बहिणीची साथ: भीषण अपघात आणि स्मृतिभ्रंशावर मात करत आथिराची यूपीएससीत गरुडझेप!

कोझिकोड: नियती जेव्हा एखादे दार बंद करते, तेव्हा जिद्दीच्या जोरावर आभाळ कसे कवेत घेता येते, याचेच जिवंत उदाहरण केरळच्या ३० वर्षीय आथिरा सुगाथन यांनी जगासमोर ठेवले आहे. तब्बल एक दशकभरापूर्वी झालेल्या एका भीषण अपघाताने ज्यांना कायमचे व्हीलचेअरवर खिळवून ठेवले आणि ज्यांची दोन वर्षे स्मृतीही हिरावून नेली, त्याच आथिरा यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२५ च्या परीक्षेत ४८३ वा क्रमांक पटकावून यशाचे शिखर गाठले आहे. हा विजय केवळ एका परीक्षेचा नसून, तो मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा उभ्या राहिलेल्या एका महिलेच्या अदम्य इच्छाशक्तीचा आहे.

आथिरा यांचा हा खडतर प्रवास २०१६ मध्ये बेंगळुरू येथे सुरू झाला. तिथे त्या बीडीएस (BDS) चे शिक्षण घेत असताना एका भीषण रस्ते अपघाताने त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली. या अपघातात त्यांच्या मणक्याला आणि डोक्याला इतकी गंभीर इजा झाली की, त्या छातीखाली पूर्णपणे अर्धांगवायूग्रस्त झाल्या. डॉक्टरांनी त्या आयुष्यभर अंथरुणाला खिळून राहतील, अशी भीती व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर, या आघातामुळे त्यांना ‘अ‍ॅम्नेशिया’ झाला, यामुळे पुढील दोन वर्षे त्यांना त्यांच्या आयुष्यातील मागील कोणत्याही गोष्टी आठवत नव्हत्या. आपण डॉक्टर होण्यासाठी अभ्यास करत होतो, हे देखील त्या पूर्णपणे विसरून गेल्या होत्या.

मात्र, दोन वर्षांच्या प्रदीर्घ उपचारानंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल सुरू झाली आणि तिथूनच त्यांच्या पुनर्जन्माचा प्रवास सुरू झाला. स्मृती हळूहळू परतल्यानंतर त्यांनी मागील तीन वर्षांत आपण काय शिकलो होतो, याचा पुन्हा नव्याने अभ्यास केला आणि जिद्दीने आपली बीडीएसची पदवी पूर्ण केली. या काळात त्यांची धाकटी बहीण अनघा हिने केलेला त्याग कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे. आथिरा यांची काळजी घेण्यासाठी अनघाने तिचे मानसशास्त्रातील शिक्षण अर्धवट सोडले आणि केवळ आपल्या मोठ्या बहिणीची सेवा करता यावी, म्हणून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आजही आथिरा आपल्या यशाचे श्रेय देताना बहिणीचा उल्लेख आपली ‘सर्वात मोठी प्रेरणा’ असा करतात.

२०२० च्या कोरोना काळात एका स्वयंसेवी संस्थेच्या दिव्यांग विभागात काम करत असताना आथिरा यांना समाजातील वंचित घटकांच्या समस्यांची जवळून जाणीव झाली. मुळात परदेशात जाऊन एमडीएस करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आथिरा यांनी या अपघातानंतर आपली स्वप्ने अधिक व्यापक केली. दिव्यांगत्वामुळे येणाऱ्या मर्यादांना त्यांनी आपली शक्ती बनवले आणि सनदी अधिकारी होण्याचे ध्येय निश्चित केले. मल्याळम साहित्याचा पर्यायी विषय निवडून त्यांनी घरी बसूनच कठोर परिश्रम घेतले. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे आणि स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी चौथ्या प्रयत्नात हे यश संपादन केले.

आथिरा आता आयएएस होण्यासाठी पुन्हा प्रयत्न करणार आहेत. जर हा अपघात झाला नसता, तर कदाचित मी कधीच नागरी सेवेचा विचार केला नसता, असे त्या अभिमानाने सांगतात. व्हीलचेअरवर बसूनही ध्येयाकडे धाव घेता येते, हे आथिरा सुगाथन यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

हेही वाचा