युद्धाचा भडका; दुबईत सोने खरेदीवर मोठी सूट

भारतातील सोन्याच्या किमतींवर परिणाम होण्याची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
43 mins ago
युद्धाचा भडका; दुबईत सोने खरेदीवर मोठी सूट

नवी दिल्ली : मध्यपूर्वेत वाढलेल्या युद्धतणावाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील (Dubai) सोन्याच्या (Gold) बाजारात मोठे चढउतार दिसून येत आहेत. इराणशी (Iran) संबंधित तणाव वाढत असल्यामुळे वाहतूक आणि पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे.  दुबईतील व्यापारी सध्या सोन्याच्या बारवर मोठ्या सवलती देत विक्री करत आहेत. या परिस्थितीचा भारतातील (India) सोन्याच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दुबईला “सिटी ऑफ गोल्ड” म्हणून ओळखले जाते. सामान्यतः भारताच्या तुलनेत दुबईत सोने स्वस्त असते, कारण तेथे आयात शुल्क आणि कर खूप कमी आहेत. त्यामुळे दुबईतील सोने भारतातील मुंबई (Mumbai), पुणे (Pune) किंवा कोलकाता सारख्या शहरांच्या तुलनेत साधारणपणे ५ ते ७ टक्के स्वस्त मिळते. त्यामुळे पर्यटक आणि आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसाठी दुबई हे आकर्षक सोन्याचे बाजारपेठ मानले जाते.

मात्र; सध्याची परिस्थिती वेगळी आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे काही विमानतळांवरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे हवाई मार्गाने सोन्याची वाहतूक अडथळ्यात आली आहे. समुद्री वाहतूकही मंदावल्यामुळे दुबईतील बुलियन व्यापाऱ्यांना सोने इतर बाजारपेठांमध्ये पाठविणे कठीण होत आहे. परिणामी साठा कमी करण्यासाठी व्यापारी सोन्यावर मोठ्या सवलती देत आहेत.

दरम्यान; जागतिक स्तरावर युद्ध आणि भूराजकीय तणाव वाढला की गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती वाढण्याचा कल असतो. परंतु दुबईमध्ये वाहतूक अडचणीमुळे स्थानिक स्तरावर उलट परिणाम दिसत असून किमती कमी होत आहेत.

तर भारतात सोन्याच्या किमती आणखी वाढणार

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे. आणि देशातील मोठा भाग सोने आयातीवर अवलंबून आहे. भारतात येणाऱ्या सोन्याचा मोठा हिस्सा दुबईमार्गे येतो. त्यामुळे जर हा तणाव दीर्घकाळ कायम राहिला तर भारतातील सोन्याच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. पुरवठा कमी झाल्यास भारतात सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.

सध्या भारतात लग्न सराईचा हंगाम आणि सणासुदीचा काळ जवळ येत असल्यामुळे सोन्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. मात्र किमतीतील अस्थिरतेमुळे अनेक ग्राहक खरेदी थांबवून परिस्थिती स्थिर होण्याची वाट पाहत आहेत.

तज्ज्ञांच्या मते, मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी बिघडल्यास केवळ सोनेच नव्हे तर तेल, चलन, शेअरबाजार आणि जागतिक पुरवठा साखळीवरही त्याचे व्यापक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठ सध्या या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

हेही वाचा