
पाटणा : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून; मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज गुरुवारी राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या सोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन ( Nitin Nabin) यांनीही पाटणा येथे राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन सादर केले.
दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत विधानसभा सचिव ख्याती सिंग यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (Samrat Choudhary) आणि विजय कुमार सिन्हा (Vijay Kumar Sinha) यांचीही यावेळी उपस्थिती होती.
आज सकाळी नितीश कुमार यांनी राज्यसभेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाने राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमार यांनी त्यांच्या कार्यकाळावर पडदा टाकला. या निर्णयामुळे बिहारच्या सत्तासमीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नितीन नबीन यांनी दाखल केला अर्ज
दरम्यान, भाजपने यापूर्वीच नितीन नबीन यांना बिहारमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती. यंदाच्या वर्षी पक्षाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या नबीन यांचा हा संसदेतला पहिलाच कार्यकाळ ठरणार आहे. ते यापूर्वी विधान परिषद सदस्य होते. बिहारमधून भाजपचे माजी आमदार शिवेश कुमार यांनाही पक्षाने दुसरे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
काँग्रेसने जाहीर केली यादी
भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या (Indian National Congress) केंद्रीय नेतृत्वाने राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे ( Mallikarjun Kharge) यांनी फुलो देवी नेताम (छत्तीसगड), करमवीर सिंह बौध (हरियाणा), अनुराग शर्मा (हिमाचल प्रदेश), एम. ख्रिस्तोफर तिलक (तामिळनाडू) तसेच अभिषेक मनु सिंघवी आणि वेम नरेंद्र रेड्डी (तेलंगणा) यांच्या उमेदवारीस मंजुरी दिली आहे.
शरद पवार महाविकास आघाडीचे उमेदवार
महाराष्ट्रात महाविकास आघाडीने ( Maha Vikas Aghadi) अनिश्चिततेला पूर्णविराम देत शरद पवार (Sharad Pawar) यांना एकमेव उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःचा दावा मागे घेत पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याने राज्यात बिनविरोध निवडणुकीची शक्यता निर्माण झाली आहे.
बिहारसह देशभरातील राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून; येत्या काही दिवसांत सत्तासमीकरण अधिक स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.