बिहारमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू; मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जातील

बिहारमध्ये भाजपचा होणार मुख्यमंत्री

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बिहारमध्ये नेतृत्व बदलाच्या हालचाली सुरू; मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जातील

पाटणा : बिहारच्या (Bihar)  राजकारणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar)  आज गुरुवारी सकाळी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने राज्यात सत्तांतराची शक्यता निर्माण झाली आहे. नितीश कुमार यांनी चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या चार महिन्यांतच हा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बिहारमध्ये भाजपचा (BJP) मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार सकाळी ११.३० वाजता बिहार विधानसभेत पोहोचून राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या पक्षाचे सहकारी रामनाथ ठाकुर हेही (जनता दल (युनायटेड) (Janata Dal (United) पक्षातर्फे उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

अमित शहा आज पाटण्यात; नव्या सरकाराबाबत होणार चर्चा

केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा (Amit Shah) हेही गुरुवारी पाटण्यात उपस्थित राहणार असून, उमेदवारी अर्ज प्रक्रियेनंतर एनडीए नेत्यांची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेबाबत सूत्रांवर चर्चा होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बिहार विधानसभेत ८९ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा दावा केला जाऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप सरकारचे नेतृत्व करेल आणि जेडीयूला दोन उपमुख्यमंत्रीपदे देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन, शिवेश कुमार तसेच आरएलएमचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा हेही राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.

जेडीयूची भूमिका स्पष्ट

जेडीयूचे वरिष्ठ नेते व मंत्री विजयकुमार चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या राज्यसभा प्रवेशाबाबत चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट केले. “जे काही होत आहे ते नितीश कुमार यांच्या संमतीनेच होत आहे. अंतिम निर्णय त्यांचाच असेल,” असे त्यांनी सांगितले.

नितीश कुमार यांच्या या निर्णयामुळे पक्षातील काही नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या निवासस्थानी वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. विजेंद्र प्रसाद यादव व मंत्री अशोक चौधरी यांनीही मुख्यमंत्री निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.

कुटुंबातही खळबळ

दरम्यान, नितीश कुमार यांच्या राज्यसभा प्रवेशाच्या चर्चेमुळे त्यांच्या कुटुंबातही खळबळ माजली. होळीच्या दिवशी कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आले होते. त्यांचे पुत्र निशांत कुमार हे या घडामोडींमुळे अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. मात्र, निशांत यांनी स्वतःसाठी कोणतेही राजकीय पद नको असल्याचे सांगितल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले.

निशांत कुमार राजकारणात प्रवेश करणार

तथापि, जेडीयूच्या सूत्रांनी निशांत कुमार यांच्या राजकीय प्रवेशाची पुष्टी केली असून, त्यांची नेमकी भूमिका काय असेल याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१६ मार्च नंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा?

पक्ष सूत्रांच्या माहितीनुसार, १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपर्यंत नितीश कुमार मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील. त्यानंतर ते पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास बिहारमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील पहिले सरकार स्थापन होऊ शकते.

राज्यसभेत निवडून आल्यास नितीश कुमार एक वेगळा विक्रम प्रस्थापित करतील. ते यापूर्वी बिहार विधानसभेचे सदस्य, बिहार विधान परिषदेचे सदस्य आणि लोकसभेचे सदस्य राहिले आहेत. राज्यसभेचे सदस्यत्व मिळाल्यास ते राज्य व केंद्राच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य राहण्याचा मान मिळवतील.

अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी उमेदवारी अर्ज, सतत सुरू असलेल्या बैठका आणि आघाडीतील हालचाली पाहता बिहारमध्ये मोठ्या राजकीय फेरबदलाची नांदी मानली जात आहे.

हेही वाचा