म्हापसा येथे ‘होळी पार्टी इव्हेंट’मध्ये हाणामारी; चार जण जखमी

पोलिसांची गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
म्हापसा येथे ‘होळी पार्टी इव्हेंट’मध्ये हाणामारी; चार जण जखमी

म्हापसा : बोडगिणी, म्हापसा (Mapusa) येथे होळीनिमित्त आयोजित ‘होळी पार्टी इव्हेंट’ (Holi Party Event)  या विशेष संगीत कार्यक्रमात दोन गटांतील वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या चारजण जखमी झाले असून, १० जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. मात्र, पोलिसांनी (Police) अजून गुन्हा नोंदवलेला नाही. 

मारहाणीत जखमी झालेल्या शौर्य मयेकर, निकिता कार्व्हालो, क्रिश नावेलकर, दिव्यम मयेकर यांचा समावेश आहे. त्यांच्यावर म्हापसा येथील जिल्हा इस्पीतळात उपचार सुरू आहेत. 

ही घटना काल बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार बोडगिणी येथील खुल्या मैदानावर  होळीनिमित्त ' होळी पार्टी संगीत रजनी' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

सकाळपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमात दिवसभर गटागटात लहानसहान भांडणे सुरूच होती. तिथे तैनात पोलिसांकडून ही भांडणे मिटविण्यात आली. 

मात्र; रात्री वरील घटनेच्या वेळी साळगाव व म्हापसा येथील दोन गटांत बाचाबाची झाली. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले.

या संघर्षात म्हापसा गटावर बियर बाटल्यांनी हल्ला करण्यात आला. त्यात शौर्य मयेकर व इतर जखमी झाले. जखमींना तत्काळ म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पीतळात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी सुरूवातीला चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, या युवकांचा मारहाणीमध्ये समावेश नसल्याचे आढळून आल्यावर त्यांना सोडण्यात आले.

मारहाणीत जखमी झालेल्यांनी १० जणांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांनी अजून याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला नाही.  मारहाणीची घटना घडल्यावर स्थानिक राजकारण्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण सामंजस्याने मिटवण्याचा प्रयत्न केला.


हेही वाचा