नियोजनबद्ध शेती केल्यास लाखो रुपयांची कमाई शक्य!

प्रगतीशील शेतकरी रविकांत नाईक : युवा पिढीने शेतीकडे वळण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
40 mins ago
नियोजनबद्ध शेती केल्यास लाखो रुपयांची कमाई शक्य!

पेडणे : सरकारी नोकरीच्या मागे धावून वेळ वाया घालवण्यापेक्षा आजच्या सुशिक्षित युवा पिढीने शेतीकडे वळून विविध पिके व उत्पादने घेतली, तर त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतल्यास आपण स्वावलंबी होऊ शकतो, असे मत चिवय-विर्नोडा येथील उत्कृष्ट युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त रविकांत नाईक यांनी व्यक्त केले.

चिवय-विर्नोडा येथील रविकांत नाईक आणि त्यांची पत्नी श्रेया आपल्या शेतात विविध पद्धतीने पिके घेऊन वर्षातील ३६५ दिवस नियमित उत्पन्न मिळवण्याचा विक्रम साधत आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले असून यंदा कलिंगड, वाली, दोडकी, भेंडी आदी पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.

रविकांत नाईक यांना उत्कृष्ट भाजीपाला उत्पादक (व्हेजिटेबल फार्मर) म्हणून शासनाचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. याबद्दल समाधान व्यक्त करताना ते म्हणाले की, नव्या युवा शेतकऱ्यांसाठी शेती हा स्वावलंबी होण्याचा उत्तम मार्ग आहे. थोडी मेहनत घेतली, तर अधिक लाभ मिळवता येतो. ज्या पद्धतीने आपण सरकारी नोकरीसाठी दिवसाचे आठ तास देतो, तेच आठ तास शेतीसाठी दिल्यास शेतीतूनही नियमित उत्पन्न मिळू शकते; किंबहुना सरकारी पगारापेक्षा अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

शेती करताना रानटी प्राण्यांपासून संरक्षणासाठीही शासन विविध योजना राबवत असते. त्या योजनांचा लाभ घेत आधुनिक पद्धतीने शेती केल्यास हरितक्रांती साध्य करता येईल आणि सरकारी नोकरीची गरज भासणार नाही. शेतीच्या माध्यमातून स्वावलंबी होत असताना इतरांनाही रोजगार उपलब्ध करून देता येतो, असेही त्यांनी नमूद केले.

कृषी खात्याच्या योजनांचा लाभ घ्या!

शासनाच्या कृषी खात्यामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. सुशिक्षित युवकांनी या योजनांचा लाभ घेत शेती व्यवसायाकडे वळल्यास त्यांना सरकारी नोकरीवर अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. पूर्वजांची शेती असल्यास ती योग्य पद्धतीने कसून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि मेहनतीने काम केल्यास भरघोस उत्पन्न मिळवणे शक्य आहे, असे रविकांत नाईक यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा