हिंद महासागरात 'आयआरआयएस देना' युद्धनौकेवर भीषण हल्ला; ३२ जण जखमी तर एक ठार

१०१ खलाशी अद्याप बेपत्ता; डिस्ट्रेस कॉल नंतर श्रीलंकन नौदलाने तत्काळ पुरवली मदत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
49 mins ago
हिंद महासागरात 'आयआरआयएस देना' युद्धनौकेवर भीषण हल्ला; ३२ जण जखमी तर एक ठार

कोलंबो/नवी दिल्ली: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका आता हिंद महासागरापर्यंत पोहोचला आहे. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून साधारण २५ मैल दक्षिणेला इराणच्या 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) या मोज श्रेणीतील युद्धनौकेवर भीषण हल्ला झाला असून, ही युद्धनौका समुद्रात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत १०१ खलाशी बेपत्ता असून ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे.



ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या 'मिलन २०२६' या बहुराष्ट्रीय नौदल सरावात सहभागी होऊन इराणला परतत होती. बुधवारी सकाळी या जहाजावरून धोक्याचा संदेश (Distress Call) प्राप्त झाला.  माहितीनुसार, एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या टॉरपीडो हल्ल्यामुळे जहाजावर प्रचंड मोठा स्फोट झाला आणि ते बुडू लागले. मात्र, श्रीलंकेच्या अधिकृत यंत्रणांनी अद्याप पाणबुडीच्या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे, श्रीलंकेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा हल्ला अमेरिका-इस्रायलच्या इराणवरील 'ऑपरेशन एपिक फ्यूरी'चा भाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे.



श्रीलंकेचे बचावकार्य आणि जखमींची स्थिती

घटनेची माहिती मिळताच श्रीलंकेच्या नौदलाने दोन जहाजे आणि विमानांच्या मदतीने मोठे बचाव अभियान राबवले. आतापर्यंत ३२ गंभीर जखमी इराणी खलाशांना समुद्रातून बाहेर काढून गॅले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान एका खलाशाचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिथा हेराथ यांनी श्रीलंकेच्या संसदेत माहिती दिली की, १८० कर्मचारी असलेल्या या युद्धनौकेवरील उर्वरित खलाशांचा शोध घेण्यासाठी नौदल आणि हवाई दल शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

Image


 इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील प्रत्यक्ष युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर इराणने मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला आहे. दुबईतील अमेरिकन दूतावास आणि सौदी अरेबियातील सीआयए स्टेशनवरही हल्ले झाल्याचे वृत्त आहे. यानंतर अमेरिकेने इराणची १७ जहाजे नष्ट केल्याचा दावा केला असून, 'ऑपरेशन एपिक फ्यूरी' अंतर्गत इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन यंत्रणा निकामी करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. हिंद महासागरातील या ताज्या घटनेमुळे आता दक्षिण आशियातील सागरी सुरक्षा धोक्यात आली आहे.


हेही वाचा