स्टॉप मोशन क्ले अॅनिमेशनचे आकर्षक प्रात्यक्षिक

सावंतवाडी : डीजी बांदेकर ट्रस्टच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सहा वर्षांवरील मुलांनी या कार्यशाळेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चित्रकला, क्राफ्ट आणि विविध सर्जनशील उपक्रमांमधून आपल्या कल्पनाशक्तीला वाव दिला.
या उपक्रमासाठी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कला महाविद्यालय तसेच डीजी बांदेकर ट्रस्ट फाउंडेशन कोर्सचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विभागप्रमुख तुकाराम मोरजकर, व्याख्याते धनंजय परब तसेच लॅब इंचार्ज सुभाषराव यांचे मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थी कौस्तुभ सरसकर, ओंकार बागवे, मिहित पिंगळे, श्रेष्ठा सिंग ठाकूर, रितेश पुरी, अनीष कमलाकर, अविष्कार शिंदे, पूर्वा चांदरकर आणि सानवी गावकर यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत मुलांना विविध कलात्मक तंत्रांचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यशाळेला अधिक प्रभावी स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या शेवटी ट्रस्टचे अध्यक्ष गोविंद बांदेकर आणि सचिव अनुराधा बांदेकर यांनी सर्व मार्गदर्शक, विद्यार्थी आणि सहभागी मुलांचे आभार मानले.
‘स्टॉप मोशन क्ले अॅनिमेशन’चे प्रात्यक्षिक
या कार्यशाळेतील विशेष आकर्षण म्हणजे ‘स्टॉप मोशन क्ले अॅनिमेशन’ या तंत्राचे सादर केलेले प्रात्यक्षिक. विद्यार्थ्यांनी फ्रेम बाय फ्रेम हालचालींची रचना कशी केली जाते आणि अॅनिमेशन कसे साकारले जाते, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. या सादरीकरणामुळे मुलांमध्ये अॅनिमेशनविषयी कुतूहल निर्माण झाले तसेच सर्जनशीलतेला नवी दिशा मिळाली.