इस्रायल–इराण तणाव तीव्र; इस्रायलमधील भारतीयांसाठी भारताकडून २४x७ हेल्पलाईन जाहीर

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
41 mins ago
इस्रायल–इराण तणाव तीव्र; इस्रायलमधील भारतीयांसाठी भारताकडून २४x७ हेल्पलाईन जाहीर

तेल अवीव/नवी दिल्ली: इस्रायलने (Israel) इराणच्या (Iran) राजधानी तेहरानमध्ये “प्रतिबंधात्मक” क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव चिघळला असून, इस्रायलमधील भारतीय नागरिकांनी (Indian Citizens) अत्यंत सावधगिरी बाळगावी, असा तातडीचा सल्ला भारताने दिला आहे.

तेल अवीव येथील भारतीय दुतावासाने ( Embassy of India, Tel Aviv) यांनी जारी केलेल्या सल्ल्यात सर्व भारतीयांनी स्थानिक प्रशासनाच्या सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे नमूद करण्यात आले आहे.


दूतावासाने नागरिकांना आपल्या निवासस्थान किंवा कार्यस्थळाजवळील निर्दिष्ट आश्रयस्थळांच्या (shelters) जवळ राहण्याचा आणि परिसरातील सुरक्षित जागांची माहिती करून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत अनावश्यक प्रवास टाळावा आणि स्थानिक बातम्या, अधिकृत घोषणा व आपत्कालीन अलर्ट यांचे नियमितपणे निरीक्षण करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

२४x७ आपत्कालीन हेल्पलाइन जाहीर

भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी दूतावासाने २४ तास कार्यरत आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे:

दूरध्वनी: +972-54-7520711

ई-मेल: [email protected]

इस्रायलमध्ये देशव्यापी आणीबाणी

संभाव्य प्रत्युत्तराच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलने (Israel) देशव्यापी आणीबाणी जाहीर केली आहे. विविध भागांत हवाई हल्ल्याचे सायरन वाजवण्यात आले असून, शैक्षणिक संस्था, सार्वजनिक जमाव आणि अत्यावश्यक नसलेल्या कामकाजावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत.

तेहरानमध्ये स्फोट; हवाई क्षेत्र बंद

दरम्यान, इराणची राजधानी तेहरान येथे मोठे स्फोट झाले.  मध्य तेहरानमधील पाश्चर स्ट्रीट परिसरातून दाट धुराचे लोट उठताना दिसले.  नुकसानीचे प्रमाण किंवा जीवितहानीबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. परिस्थिती झपाट्याने बदलत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांनी आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे. मध्यपूर्वेत व्यापक लष्करी संघर्षाची शक्यता व्यक्त होत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा